Lonavala : … अखेर ‘अमृतांजन पूल’ झाला इतिहास जमा; ब्लास्टिंग करुन पाडला पूल (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज अखेर इतिहास जमा झाला. द्रुतगती मार्गाला अडथळा ठरणार्‍या पुलाच्या चारही खांबांना एकाचवेळी ब्लास्टिंग करुन रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता स्फोट करुन हा पुल जमिनदोस्त करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नियुक्त केलेल्या नवयुग टिमचे प्रमुख अनिल कुमार आणि टिमकडून हे काम आज फत्ते झाले. आज रविवारी सकाळपासून पुलाच्या दगडी खांबांना सुरुंगाची दारु भरण्याकरिता होल करण्याचे काम सुरु होते. साधारण प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला.

4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. काल पुलावरील पाईपलाईन हालविल्यानंतर आज पुलाच्या खांबांना ब्लास्टिंग करीता होल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता पुण्याकडे जाणारी सर्व वाहने अंडा पाँईट येथून जुन्या मार्गाने तर मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट येथून लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. ब्लास्टिंगच्या वेळी दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली होती. ब्रिटिशकाळात कोकण प्रांत हा दक्षिण महाराष्ट्राला जोडण्याकरिता ह्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती.

हा पूल धोकादायक झाल्याने त्यांच्यावरुन वाहतुक मागील काही वर्षापासून बंद करण्यात आली होती. ह्या पुलाच्या खालून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जातो, पुलामुळे मार्गावर वळण आले असून रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे वारंवार याठिकाणी अपघात घडत असल्याने तो वाहतुकीकरिता अडचणीचा ठरत होता. मागील तिन वर्षापासून हा पुल पाडण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, द्रुतगती मार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते.

सध्या भारतात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन आहे, त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुक तुरळक असल्याने येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पुल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आज पुल पाडण्यात आला असून पुढील दोन दिवसात रस्त्यावरील मातीचे ढिग व दगड बाजुला केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.