Lonavala : वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिरस्थावर तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या वाहन तपासणी दरम्यान दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता  व संध्याकाळी ७ वाजता ही कारवाई करण्यात आली. 
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख, पोलीस कर्मचारी विशाल जांभळे, संतोष शेळके, शरद जाधवर, काळे, योगेंद्र जगताप, अमित ठोसर, जाधव व चालक उर्किडे यांच्यासह स्थिरस्थावर तपासणी पथकाचे महेश जगताप  व पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाकडून दुपारी साडेबारा वाजता वाहन तपासणी सुरू असताना फॉर्च्युनर गाडी (एम एच 14 GK 9111) आली.

  • या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तीन लाख रुपयांची रोकड मिळून आली. सदर रकमेबाबत वाहन चालकाकडे विचारणा केली असता त्याला कोणते समाधानकारक उत्तर देता आले नाही. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टोलनाक्यावर आलेल्या इको फोर्ड कार (एम एच 04 B 6475) या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन लाख रुपयांची रोकड मिळून आली.

सदर रक्कमेबाबत चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रक्कम पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात वरसोली टोल नाका परिसरात चार वाहनांमधून 11 लाख 80 हजार रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.