Lonavala : शहरात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा

एमपीसी न्यूज – गुढीपाडवा आणि मराठी हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त लोणावळा शहर व परिसरात हिंदु समिती लोणावळा शहर तसेच ग्रामीणच्या वतीने भव्य दुचाकी शोभायात्रेचे आयोजन केले होते.

हिंदु समितीचे सदस्य व मान्यवरांच्या हस्ते पुरंदरे मैदानावर सकाळी अकरा वाजता गुढीचे व रथाचे पुजन करत शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत सुरुवातीला प्रभु श्रीरामांचा रथ, तदनंतर दुचाकी मध्यभागी छत्रपती शिवरायांची प्रतिमा व भारतमातेची प्रतिमा असलेली वाहन व पुन्हा दुचाकी वाहने अशी अतिशय नियोजनबध्द व शिस्तबध्द पध्दतीने ही शोभायात्रा भांगरवाडी इंद्रायणी पुलावरुन बाजारपेठ मार्गे शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा पुतळा चौक मार्गे कुमार चौक ते मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन खंडाळा येथे गेली.

  • या ठिकाणाहून पुन्हा फिरुन गवळीवाडा, तुंगार्ली मार्गे, वलवण, वरसोली येथून वाकसई चाळ व वाकसई येथे संत तुकाराम महाराज झाड पादुकास्थान वाकसई येथे सदर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रे दरम्यान बाजारभाग, कुणेगाव फाटा, खंडाळा बाजारपेठ, गवळीवाडा नाका याठिकाणी शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करत स्वागत व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

जगतगुरु संत तुकाराम महाराज झाड पादुकास्थान वाकसई याठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला. याठिकाणी शिवव्याख्याते डाॅ. गजानन वावर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी गजानन महाराज वावर यांनी उपस्थित जनसमुदायाला गुढीपाडवा या दिवसाचे व वैदिक हिंदुधर्माचे महत्व विशद करुन सांगितले. सनातन हिंदु धर्म व संस्कृती ही सर्व संस्कृतीमध्ये श्रेष्ठ आहे असे सांगितले.

  • आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. तुम्ही धर्माचे व संस्कृतीचे रक्षण करा, ते तुमचे रक्षण करेल असा संदेश यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांचे आचार विचार जोपासा, संघटित व्हा, धर्म वाढविण्याचा संकल्प आजच्या दिवशी करा, असा सल्ला यावेळी महाराजांनी दिला.

याप्रसंगी मान्यवर व हिंदु तरुण तरुणी मोठया संख्येने उपस्थित होत्या. नियोजनबध्दपणे दीड तासाच्या फेरीनंतर या शोभायात्रेचा समारोप झाला. लोणावळा उपविभागीय कार्यालयासह लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलीसांनी शोभायात्रेला वाहतुकीचा कसलाही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली होती. वाकसई गाव व पंचक्रोशीतील हिंदु ब‍ांधवांनी शोभायात्रेच्या समारोप ठिकाणी अल्पोहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.