Lonavala : अनाथांच्या पालन पोषणासाठी मिळणारी मदत कोरोनामुळे ठप्प; 450 अनाथांचा नाथ असलेली संपर्क संस्था आर्थिक विवंचनेत

एमपीसी न्यूज – पुणे आणि रायगड जिल्ह्यातील पाच ठिकाणी संपर्क संस्थेचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये 450 अनाथ मुले निवासी शिक्षण घेत आहेत. मागील 30 वर्षांपासून अनाथ मुलांचा आधार बनलेली संस्था कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निराधार झाली आहे. संस्थेला मिळणारी सर्व मदत ठप्प झाल्याने संस्था आर्थिक विवंचनेत अडकली आहे. त्यामुळे संपर्क संस्थेचे संस्थापक सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी संस्थेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. जगातील सर्वच देश या बिकट परिस्थितीचा सामना करीत आहेत. प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुरक्षित करण्याच्या विवंचनेत आहे. आपण सर्वजण आपापल्या घरात राहून ज्या प्रकारे स्वतःची आणि इतरांची काळजी घेत आहोत, त्याच प्रमाणे संपर्क या अनाथ निराधार बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील कर्मचारी देखील आपले घरदार सोडून या बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

संपर्क संस्थेची स्थापना 1990 साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक दानशूर लोकांनी संस्थेला मदत केलेली आहे. आजमितीला संस्थेत पुणे जिल्ह्यातील भाजे, मळवली, नांदगाव (लोणावळा), शेलपिंपळगाव (चाकण) व रायगड जिल्ह्यातील पोयनाड (अलिबाग) अशा विविध प्रकल्पात मिळून एकूण 450 अनाथ बालके वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी 50 पेक्षा जास्त कर्मचारी त्यांच्यासोबत राहत आहेत.

सध्याचा काळ हा सर्वांचीच परीक्षा पाहणारा आहे. संस्थेतील बालकांना लागणारा धान्यसाठा, स्वच्छतेचे साहित्य, गॅस, वीज देयक व अहोरात्र या बालकांसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन याची बिकट अवस्था झाली आहे. संस्थेतून बाहेर पडून आपल्या पायावर उभे असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी हात पुढे केलेले आहेत. या मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे सुरु असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे संस्थापक, संचालक अमितकुमार बॅनर्जी सांगतात.

सध्या देशात व जगात सुरु असलेली कोरोनाची दाहकता पाहता पुढील काही काळ सर्वांसाठीच अडचणीचा ठरणार आहे. संस्थेला आजतागायत मदत करणाऱ्या अनेक भारतीय, परदेशी व्यक्ती कोरोनाच्या संक्रमणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होरपळल्या आहेत. परंतु अनाथ व निराधार बालकांना सुरक्षित ठेवण्याचा सामाजिक वसा घेतलेल्यांसाठी या बालकांची सुरक्षितता हीच प्राथमिकता आहे. या अनाथांचा नाथ होऊन आर्थिक मदत करावी असे आवाहन बॅनर्जी यांनी केले आहे.

ऑनलाइन मदतीसाठी –

Account Holder – SAMPARC (Social Action For Manpower Creation)

Account Number – 677104000030250

Bank Name – IDBI Bank

IFSC – IBKL0000677

A/C – Saving

Branch – Talegaon Dabhade, Pune

50% Tax exemption available under 80G

माहितीसाठी संपर्क –

प्रदीप वाडेकर (9766343451), योगेंद्र कुलकर्णी (7447439867), www.samparc.org

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.