Lonavala : स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना अटक; तीन गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात घरफोडी करणा-या दोन सराईत चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील दोन आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

वसीम रुबाबअली शेख (वय 23, रा. न्यु तुंगार्ली रोड, इंदिरानगर, लोणावळा), रवींद्र दशरथ कालेकर (वय 27, रा. वळकाईवाडी, कुसगाव, ता.मावळ) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी बंद रुमच्या बाथरूममधून घरात प्रवेश केला. घरातून सोन्याची अंगठी, चेन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 54 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा शहर पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 29 हजारांचा ऐवज जप्त केला. तसेच वसीम याने यापूर्वी लोणावळा शहरात दोन आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केल्याचे सांगितले. या कारवाईमुळे लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील दोन आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like