Lonavala : थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांच्या हाॅटेल व्यावसायिकांना सूचना

एमपीसी न्यूज- थर्टीफस्ट व नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांच्या दरम्यान हाॅटेल व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करत सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, स्पीकरचा आवाज डेसिबलच्या मर्यादेत ठेवावा असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.

ख्रिसमस, थर्टीफस्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी प्रमाणे यंदा लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच लोणावळा शहर पोलिसांनी शहरातील सर्व हाॅटेल व्यावसायिकांची बैठक घेत त्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना दिल्या.

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी यावेळी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. हाॅटेलच्या आवारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची मुख्य खबरदारी घेत हाॅटेलात येणार्‍या वाहनांची तपासणी व नोंदी ठेवणे, पर्यटकांच्या ओळखपत्रांची तपासणी करणे, पार्टी दरम्यान काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत पुरेसा सुरक्षा बंदोबस्त तैनात करणे, थर्टीफस्ट व न्यु इयर पार्टी करिता सर्व शासकीय विभागांचे परवाने घेऊनच सेलिब्रेशन साजरे करावे, पार्टी दरम्यान लावण्यात येणार्‍या स्पिकरचा आवाज हा डेसिबलच्या मर्यादेत असावा, हाॅटेलच्या आवारातील हालचाली टिपण्याकरिता सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना करण्यात आल्या.

पोलीस उपअधिक्षक शिवथरे म्हणाले, “नियमांचा कोणीही भंग करु नका, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, खासगी बंगले धारकांनी परवाना न घेता बंगले भाड्याने दिल्यास त्याच्यावर कलम 188 प्रमाणे खटले दाखल करण्यात येतील”

पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले, “कोणत्याही व्यावसायिकांला त्रास देण्याचा आमचा हेतू नाही मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व दिलेल्या सुचनांचे पालन करावे, हायवे लगतच्या व्यावसायिकांनी महामार्गावर अथवा मुख्य मार्गावर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याकरिता कर्मचारी नियुक्त करावेत” असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.