BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : हॉटेलच्या खिडकीची काच उचकटून हजारो रुपयांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – सुट्टी व्यतीत करण्यासाठी आपल्या कुटुंबासह पर्यटन नगरी लोणावळा येथे आलेल्या आणि येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांच्या रूमच्या खिडकीची काच उचकटून त्यांचा हजारो रुपयांचा माल लंपास करण्यात आल्याची घटना रविवारी लोणावळा शहरात घडली.

यासंदर्भात रोहित गोवर्धन झामनानी (वय ३४, रा.राजस्थान) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे.

  • रोहित हे व्यवसायाने डॉक्टर असून सिकंदराबाद, तेलंगणा येथील लष्करी रुग्णालयात काम करतात. रोहित हे आपली पत्नी, मुलगा, आई आणि वडील यांच्यासह ते शनिवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी आले होते. त्यांनी येथील हॉटेल सीट्रसमध्ये दोन वेगवेगळ्या रूमचे बुकिंग केलं होतं. शनिवारी रात्रीचे जेवण उरकून रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ते रूममध्ये गेले आणि आपला आयफोन मोबाईल तसेच आपले पाकीट रुममधील टेबलावर काढून ठेवले.

सकाळी सात वाजता त्यांना जाग आल्यावर त्यांनी बघितले असता रूमच्या खिडकीची काच उचकटलेली होती तसेच त्यांचा व त्यांच्या पत्नीचा मोबाईल आणि सात हजाराची कॅश असलेले त्यांचे पाकीट असा एकूण ४७ हजाराचा माल गायब झाला होता.

  • रोहित यांनी रूममध्ये शोधाशोध केली मात्र, त्यांना ते मिळून न आल्याने त्यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सांगळे आणि पोलीस हवालदार सामील प्रकाश हे पुढील तपास करीत आहेत.
.