Lonavala : लॉकडाऊनमध्ये तोतया पोलिसाचा वावर; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : कारला पोलीस नावाची पाटी लावून संचारबंदीच्या काळात शहरात प्रवेश करु पाहणार्‍या तोतिया पोलिसाला लोणावळा शहर पोलीसांनी नाकाबंदीमध्ये पकडले. त्याच्यावर भादंवि कलम 419, 188 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित गोविंद वरलीकर (वय 26, रा.गृहलक्ष्मी निवास , एकविरा कार्ला रोड, दहिवली, ता. मावळ, मूळ रा. वरळी व्हिलेज, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल चंद्रकांत गव्हाणे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीच्या अनुषंगाने लोणावळा शहर पोलीसांनी कुमार चौकात चेकपोस्ट लावत शहरात विनाकारण येणार्‍या वाहनांची तपासणी सुरु केली होती. आज ( गुरुवारी) दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास सफेद रंगाची कार (एमएच 14 एचडी 1337) ही चेकपोस्टवर आली.

या कारच्या दर्शनीभागावरील काचेवर काचेवर आतमधून पोलीस नावाची पाटी लावली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व कर्मचारी यांनी चौकशी केली असता, ‘मी पोलीस असून बंगल्यातील कुत्र्यांना पिडीग्री आणण्यासाठी लोणावळा शहरात जात आहे, असे त्याने सांगितले.

त्यावर पोलिसांनी खात्री करण्याकरिता ओळखपत्राची मागणी केली असता तो पोलीस नसल्याचे निष्पन्न झाले. संचारबंदी कालावधीत लोणावळा शहरात प्रवेश देण्यासाठी पोलीस असल्याची खोटी बतावणी व तोतयागिरी करुन महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाची अवज्ञा केली म्हणून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.