Lonavala : विद्यार्थ्यांनो आपले ध्येय निश्चित करा – नवनीतकुमार काँवत

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांनो जीवनात ध्येय गाठण्याकरिता आपले ध्येय निश्चित करा असा मोलाचा सल्ला आयपीएस अधिकारी व लोणावळा विभागाचे पोलीस उपअधिक्षक नवनीतकुमार काँवत यांनी विद्यार्थ्यांना दिला. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्पर्धा परीक्षा विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमात नवनीतकुमार काँवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन तसेच वृक्षास जल अर्पण करून राष्ट्रीय सेवा योजना गीताद्वारे झाली. याप्रसंगी सिंहगड संकुलाचे संचालक व प्राचार्य डॉ. माणिक गायकवाड, प्रा.डॉ.जयवंत देसाई, प्रा डॉ मिलिंद रोहोकले उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नवनीतकुमार काँवत यांनी स्वतःचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. काँवत म्हणाले, “माझे शिक्षण सैनिक स्कूलमध्ये झाले व इयत्ता दहावीचा निकाल माझ्या आयुष्यामध्ये “टर्निंग पॉइंट” ठरला. आय. आय.टी रुरकी मधील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मधली पदवी घेतल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, आय.ई.एस., इंडियन रेल्वे मधील इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा, आयकर खात्यामधील आय. आर. एस. मध्ये आयकर उपायुक्त अशी यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना आय. ए.एस. अथवा आय.पी.एस. असे ध्येय निश्चित करत गेलो आणि 2017 च्या बॅचचा आय.पी.एस. अधिकारी झालो. हे करत असताना मला आयपीएस व्हायचे हे ध्येय निश्चित केले होते.

विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी अभ्यास कसा करावा, नोट्स कशा असाव्यात यासंबंधी माहिती देताना अनेक वैयक्तिक आयुष्यामधील अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्याकरिता हे व्याख्यान प्रेरणादायक ठरणार असल्याचा आशावाद यावेळी सिंहगड संकुल संचालक डाॅ. माणिक गायकवाड यांनी व्यक्त करत संस्थेच्या कार्याचा आढावा विषद केला.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात विशेष कार्य करणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन याप्रसंगी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी सुमित देवर्षी, संतोष दबडे, आयईटीई क्लबचे प्रा. शेंडे, मयूर राऊत व सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.