Lonavala : नोकरीची हमी मिळविण्याकरिता आयआरबी कामगारांचा बेमुदत संप

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा आयआरबीचा ठेका संपत असल्याने याठिकाणी काम करणार्‍या स्थानिक कामगारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नोकरीची हमी मिळावी, या मागणी करिता देखभाल आणि दुरुस्ती विभागात काम करणार्‍या स्थानिक 179 कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या निर्मितीपासून स्थानिक भूमीपुत्र पूर्वी शिंदे इन्फ्रा आणि तदनंतर आयआरबी कंपनीकडे कामाला आहेत. द्रुतगती मार्गावरील आयआरबी कंपनीचा टोल वसुलीचा ठेका येत्या ऑगस्ट महिन्यात संपणार असल्याने आयआरबी कंपनीत वर्षानुवर्षे काम करणार्‍या कामगारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • मागील काही दिवसांपासून कामगार याबाबत आयआरबी कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे पाठपुरावा करत असताना त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कामगारांना संप करण्याची वेळ आली आहे. सर्व कामगार हे स्थानिक भुमीपुत्र असून रस्ते बनविताना अनेकांच्या जागा या प्रकल्पाकरिता बाधित झाल्या आहेत.

कंपनीचा ठेका बंद झाल्यास स्थानिक कामगारांच्या कामावर गडांतर येणार असल्याने कामाची शाश्वती मिळावी, नवीन ठेकेदार आल्यास कामगारांना कामावर कायम ठेवावी, या मागणी करिता हा संप पुकारण्यात आला आहे. पुणे जिल्हा मजदूर संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार हितासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.