Lonavala : खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राला देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्र पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- सदरक्षणाय…खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य म्हणून जनतेच्या सुरक्षेकरिता अखंड कार्यतत्पर असणारी पोलिसांची प्रशिक्षित पिढी घडविणार्‍या खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्राला देशातील सर्वोत्तम पोलीस प्रशिक्षण केंद्र‍ाचा मान प्राप्त झाला आहे.

पोलीस अनुसंधान एवं विकास ब्युरो, गृह मंत्रालय यांच्याकडून देशांतर्गत सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्राकरिता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे पुरस्कार देण्यात येतात. सन 2015-16 साली पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळ्याचे तत्कालीन प्राचार्य प्रकाश जाधव यांनी अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कार्याचा प्रस्ताव तयार करुन पुलिस अनुसंधान एवं विकास ब्युरो, गृह मंत्रालय यांचेकडे सादर केला होता.

त्या अनुषंगाने केंद्रीय उच्च समितीने खंडाळा प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली होती. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व गोवा या चार राज्यामधून इतर प्रशिक्षण केंद्र या प्रवर्गातून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राची निवड करण्यात आली आहे. केंद्राकडून यानिमित्त प्रशिक्षण केंद्राला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या स्मिता पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.