Lonavala : टाकवे गावात ग्रामस्थांना दिसला बिबट्या

एमपीसी न्यूज- लोणावळ्याजवळील टाकवे खुर्द गावात डोंगरावर बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये एकच घबराट उडाली आहे. या बिबट्यांने अद्याप गावात प्रवेश केला नसला तरी ग्रामस्थांनी सर्तक रहावे असा इशारा वन विभागाने दिला आहे.

शिरोता धरणाच्या डोंगरालगत टाकवे गाव असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा वावर असतो. मंगळवारी रात्री नागरी वस्तीच्या जवळ काही ग्रामस्थांना बिबट्या दिसल्याने टाकवे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टाकवे गावात बिबट्या दिसल्याचे समजल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी संजय मारणे व वन्यजीव रक्षक संस्थेचे पदाधिकारी व टाकवे ग्रामस्थांनी परिसरात बिबट्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. पण बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकवे गावात जाऊन लोकांना बिबट्यापासून काय काळजी घ्यायची याची माहिती दिली. त्यांना बिबट्या दिसला तर त्यांनी फटाके वाजवावेत. रात्री उशिरा एकट्याने बाहेर पडू नये, अंगणात झोपू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्या हा सध्यातरी त्याच्या जंगलाच्या हद्दीतच आहे. त्याने गावात प्रवेश केला नाही अथवा कोणावर हल्ला केलेला नाही. हे पिल्लू असल्याने त्याची मादीही जवळपास असण्याची शक्यता आहे. जर पिल्लाला पकडले तर मादी हिंसक होऊ शकते. त्यामुळे अजून तरी पिंजरा लावण्याचा आलेला नसून वन अधिकारी या बिबट्याचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.