Lonavala : शहरात ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी लाॅकडाऊन

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून लोणावळा शहरातील सर्व भाजीपाला, किराणा दुकाने, बेकरी, चिकन व मटण असे सर्व व्यावहार सोमवार आणि मंगळवारी (दि.13 आणि 14 एप्रिल) पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय व्यावसायकांनी एकमुखाने घेतला आहे.

लोणावळा नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, व्यापारी व मेडिकल व्यावसायकांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत संचारबंदी व जमावबंदी असताना देखिल बाजारभागात होणार्‍या गर्दीवर चिंता व्यक्त करण्यात आली.

मुंबई पुणे भागात वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या व त्यामुळे लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात कोरोनाची लागण होण्याची संभाव्य शक्यता ध्यानात घेता लोणावळा बाजारपेठ देखिल सोमवार व मंगळवार दोन दिवस बंद ठेवण्याचे जाहिर केले.

लोणावळा शहरातील प्रत्येक विभागात भाजी व किराणा दुकाने असताना देखिल नागरिक कारण नसताना खरेदीच्या बहाण्यांने लोणावळा बाजारपेठेत मुक्तसंचार करतात. त्यांच्यावर चाप बसविण्याकरिता कुमार चौक, भांगरवाडी चौक व कैलासनगर येथे चेकपोस्ट व नाकाबंदी करण्यात येणार आहे. याकरिता नगरपरिषदेचे 24 कर्मचारी व पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात असणार आहेत.

अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय कोणालाही या चेकनाक्यांवरुन शहरात प्रवेश दिला जाणार नाही. ज्यांना भाजीपाला, किरणा हवा असेल त्यांनी त्यांच्या घराशेजारच्या दुकानांमध्ये खरेदी करावा कोणीही बाजारात त्याकरिता येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.