Lonavala : संततधारमुळे लोणावळा धरण ओव्हरफ्लो; हनुमान टेकडीवर घर कोसळले, एकाचा मृत्यू

नौसेना बागला पाण्याचा विळखा; हुडको वसाहतीला इशारा

एमपीसी न्यूज – लोणावळा शहराच्या वरील बाजूला असलेले टाटा कंपनीचे लोणावळा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या मोर्‍यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी शहरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत येऊ लागले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी नौसेना बाग ह्या आयएनएस शिवाजी अधिकार्‍यांच्या वसाहतीत पसरल्याने ह्या ठिकाणाला पुराचा विळखा पडला आहे. नदीपात्रात पाणी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने हुडको वसाहतीला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. संततधारमुळे हनुमान टेकडीवर घर कोसळले. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून त्याची बहीण जखमी झाली आहे.

लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे सकाळी साडेसात वाजता एक घर कोसळल्याने कुणाल अजय दोडके या (वय 10) वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, कुणालची लहान बहिन नंदिनी (वय 9) ही जखमी झाली आहे.

  • पावसाचा जोर कायम राहिल्यास हुडको वसाहतीमध्ये पाणी घुसण्याची भिती निर्माण झाल्याने याठिकाणी आप्तकालीन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. काही नागरिक हे भितीपोटी घरांना टाळे लावून नातेवाईकांकडे निघून गेले आहेत.

लोणावळा शहरात मागील 24 तासात हंगामातील विक्रमी पाऊस म्हणजेच 384 मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाची संततधार आजही कायम असल्याने येथिल जनजिवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी नांगरगाव येथिल जाधव काॅलनी, आदर्श वसाहत, नक्षत्र सोसायटी भागात साचल्याने येथिल नागरिकांना गुडघाभर पाण्यातून ये जा करावी लागत आहे. नांगरगाव भांगरवाडी रस्त्यासह, वलवण पुल, बापदेव रोड, र‍ायवुड, तुंगार्ली भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते.

  • लोणावळा शहराप्रमाणेच इंद्रायणी नदीला ग्रामीण भागात पुर आल्याने सांगिसे, वाडिवळे या आठ गावांना जोडणारा पुल पाण्याखाली गेला होता. कार्ला, मळवली, सदापुर, वाकसई चाळ, डोंगरगाव भागात पुराचे पाणी पसरले होते. नाणे पुल देखील पाण्याखाली गेल्याने नाणे मावळाचा संपर्क तुटला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.