Lonavala: कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्याकरिता नगराध्यक्षा 24 तास ‘ऑन ड्युटी’ 

एमपीसी न्यूज – कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करत असताना त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनीही कंबर कसली असून कर्मचार्‍यांच्या सोबत ते 24 तास ‘ऑन ड्युटी’ असल्याचे पहायला मिळत आहेत.

कोरोना या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला, यानंतर बहुतांश देश व राज्य पातळीसह विविध जिल्ह्यातील व तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी घरात बसण्यास प्राधान्य दिले आहे. असे असताना महिला नगराध्यक्षा असलेल्या सुरेखा जाधव यांनी मात्र माझ्या लोणावळा शहरातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी असल्याचे सांगत पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम सुरु केले आहे.

स्वतः नगराध्यक्षा रस्त्यावर उतरुन त्यांच्या गाडीला ध्वनीक्षेपक लावत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. प्रत्येक वाॅर्डात त्यांची गाडी फिरत आहे. तातडीने शहरातील सर्व परिसरात जंतूनाशक पावडर व हायफोक्लोराईंड लिक्विड फवारणी सुरु केली आहे. कर्मचारी व अधिकारी यांच्या मनात कोरोनाची भिती निर्माण होऊ नये याकरिता त्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत चोवीस तास सज्ज आहेत. ज्याठिकाणी काम करताना अधिकारी व कर्मचारी यांना अडचण येथे तेथे ही डबंग लेडी सामोरी जात प्रश्न निकाली लावत आहे.

पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, रेल्वे प्रशासन या सर्वांच्या सोबत ताळमेळ बसवत नागरिकांना सेवा देण्याकरिता त्या तत्पर आहेत. कोरोनाचे संकट डोक्यावर असताना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यात नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये याकरिता वाॅर्डनिहाय त्यांनी कार्यकर्त्यांची नावे व मोबाइल नंबर प्रसिध्द केले आहे. त्यांना फोन करा तुम्हाला आवश्यक असणार्‍या वस्तु घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. शहरातील गोरगरिब व हातावर पोट असणार्‍या नागरिकांची ह्या महामारीच्या काळात उपासमार होऊ नये याकरिता गरिबांना अन्नधान्य वाटप सुरु केले आहे.

अर्थात या कामात त्यांना उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी या नेत्यांसह शहरातील विविधा सामाजिक व धार्मिक संघटना हातभार लावत आहेत.

कोरोनाच्या भीतीने दादा, भाऊ, आण्णा, युवानेते, भावी नेते सर्वसामान्यांना वार्‍यावर सोडून घरात बसलेले असताना शहरातील नागरिकांकरिता कोरोनाशी दोन हात करत लढणार्‍या या नारीशक्तीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणाले, ताई आमच्याकरिता ताकद व प्रेरणा आहे, त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे लोणावळा शहरात योग्य नियोजन करण्यात यश आले आहे. कोरोना आजाराची कसलीही तमा न बाळगता माझ्या शहरातील प्रत्येक नागरिक या आजारापासून कसा बचावेल, या ध्येयाने नगराध्यक्षा काम करत आहेत. त्यांचा आदर्श इतर शहरांमधील लोकनेत्यांनी घ्यावा असाच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.