Lonavala : लोणावळा नगरपरिषदेतर्फे गरोदर महिलांचे सामूहिक ओटीभरण

महिला बालकल्याण विभागाचा अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात राहणार्‍या गरोदर महिलांचा सामूहिक ओटीभरणाचा आगळावेगळा सोहळा लोणावळा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पार पडला. यामध्ये 20 महिलांचे सामूहिक ओटीभरण करण्यात आले.

लोणावळा परिसराचा सर्व्हे करत 62 गरोदर महिलांचे सामूहिक ओटीभरणाचा अनोखा उपक्रम नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आला होता. यापैकी काही महिलांनी बाळाला जन्म दिला तर काही ओटी भरणाला येण्याच्या स्थितीत नसल्याने उर्वरित महिलांचे ओटीभरण नगराध्यक्षा सुरेखा जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सुर्वणा अकोलकर, उपसभापती गौरी मावकर व मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आरोग्य समिती सभापती संध्या खंडेलवाल, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती मंदा सोनवणे, काॅग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, माजी नगराध्यक्षा रेखा जोशी, सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे, भाजपाच्या शहराध्यक्षा योगिता कोकरे, पार्वती र‍ावळ यांच्यासह नगरसेविका व शहरातील मान्यवर महिला उपस्थित होत्या.

गरोदर काळात महिलांना आधार देण्यासोबत जन्माला येणार्‍या बाळाचे स्वागत करण्याकरिता महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे नगराध्यक्षा जाधव व सभापती अकोलकर यांनी सांगितले. जाधव म्हणाल्या, “जन्माला येणार्‍या मुलीच्या भविष्याकरिता काही निधी सदर मुलीच्या नावे फिक्स डिपाॅजिट करण्यात येणार आहे. स्त्री जन्माचे स्वागत व सन्मान या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.