Lonavala : ग्रामीण पोलिसांची 59 जणांवर कारवाई; 47 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज – लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घराबाहेर विनाकारण फिरणार्‍या 59 जणांवर आतापर्यंत भादंवि कलम 188 अंतर्गत कारवाई केली असून त्यांची 47 वाहने जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर अधिक्षक विवेक पाटील व लोणावळा उपविभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रनवरे यांनी लोणावळा ग्रामीण परिसरातील गावांमध्ये, चौकाचौकांत व वरसोली टोलनाक्यांवर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच पुणे मुख्यालयातील कर्मचारी, सीआयडीचे अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक तुकडी असा बंदोबस्त नियुक्त केला आहे.

रात्रंदिवस याठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना येथून प्रवेश दिला जात आहे. ‘एक्सप्रेस वे’वर खालापूर टोलनाका व उर्से टोलनाका येथे वाहन तपासणी केली जात आहे. असे असले तरी काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत.

चेक नाक्यावर त्यांना आडविल्यानंतर मेडिकलचे अथवा भाजीपाल्याची खोटी कारणं सांगत लोणावळ्यात जाण्याचा प्रयत्न करतात. अशा 59 जणांवर आतापर्यत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम 188 प्रमाणे कारवाई करत पुन्हा ते घराबाहेर पडू नयेत, याकरिता त्यांची 47 जप्त केली आहेत. तरी देखिल गावांमध्ये नागरिक फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या व इतरांच्या जीवनाचे रक्षण करण्याकरिता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन संदीप घोरपडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.