Lonavala : लोणावळा वाहतूक शाखेची 30 दिवसात 1937 वाहनांवर कारवाई; 5 लाख दंड वसूल

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणार्‍या तब्बल 1937 वाहनांवर नोव्हेंबर महिन्यात कारवाई करत सुमारे 5 लाख 1 हजार 800 रुपये दंड वसूल केला.

पुणे जिल्ह्यात सर्वांधिक दंड हा लोणावळा शहरातून वसूल होत आहे. पर्यटनाचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात स्थानिकांसह पर्यटक वाहनांचा सर्वाधिक वावर असतो, मुंबई, पुणे, गुजरात भागात नियमांचे पालन करणारे लोणावळ्यात मात्र बेशिस्तपणे वागतात यामुळे दंडाचे प्रमाण वाढले आहे.

लोणावळा हे पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे फिरायला येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. शहरातील रस्त्याच्या क्षमतेपेक्षा काही पटीने वाहने येत असल्याने येथे वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. त्यातच वाहनचालक नियमांची पायमल्ली करत भर घालतात, ‘नो युटर्न’चा फलक समोर असताना युटर्न घेणे, नो पार्किंगच्या बोर्डखालीच वाहन लावणे, दुचाकीवरुन सर्रास ट्रिपल सिट फिरणे, लायसन्स जवळ न बाळगणे, अवैध प्रवासी वाहतुक करणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, रहदारीला अडथळा निर्माण होईल असे वाहन उभे करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे.

अशा विविध मोटार वाहन कायद्यातील कलमांन्वे सदरच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाई झालेल्या वाहनांमध्ये स्थानिक वाहनांपेक्षा बाहेरील वाहनांची संख्या जास्त आहे.

याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील म्हणाले, दंड करणे हा आमचा उद्देश नसून वाहनचालकांना शिस्त लागावी ही आमची भावना आहे. वाहनचालकांनी बेशिस्तपणाला लगाम लावत नियमांचे पालन केल्यास शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सुटेल तसेच वाहतुक नियमन योग्य प्रकारे होण्यास मदत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.