Lonavala : बाहेरील नागरिकांना बंगले भाड्याने देणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार – लोणावळा नगरपरिषद

Lonavla Municipal Council will file a case against those who rent out bungalows to outsiders

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह विविध भागातून नागरिक लोणावळा शहरात येण्याचा प्रयत्न करत आहेत. या नागरिकांना भाड्याने बंगले देऊन शहराची सुरक्षितता धोक्यात घालणार्‍याविरूद्ध आता गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा लोणावळा नगरपरिषदेने दिला आहे.

मुंबई – पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनामुक्त भाग म्हणून अनेकांनी लोणावळा खंडाळा व मावळातील ग्रामीण भागात येण्याला प्राधान्य दिले आहे. काही नागरिकांचे लोणावळ्यात व परिसरात बंगले व फार्महाऊस आहेत.

थंड हवेचे व पर्यटनाचे ठिकाण असलेल्या लोणावळा व खंडाळात बंगले भाड्याने देणारे अनेक कमिशन एजंट आहेत. ते आँनलाईन बुकिंग घेऊन बंगले भाड्याने देतात. काही माळी मंडळी व बंगल्याचे केअर टेकर देखिल परस्पर बंगले भाड्याने देत असतात.

लोणावळा नगरपरिषदेने बंगले भाड्याने देणाऱ्यांना नुकतीच ताकिद देण्यात आली असून बंगले भाड्याने दिल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यभरात कोरोनाचा कहर वाढत असताना लोणावळा शहर अद्याप या महामारीपासून सुरक्षित राहिले आहे. लोणावळा शहरातील तुंगार्ली, गोल्ड व्हॅली, खंडाळा, जुना खंडाळा, वलवण, नांगरगाव, कुरवंडे, कुणेनामा, वरसोली, वाकसई, कार्ला, मळवली भागात अनेक धनिकांचे बंगले व फार्महाऊस आहेत.

बाहेरून येणार्‍या नागरिकांपासून शहरात कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस सर्वोतोपरी खबरदारी घेत आहेत.

स्थानिक नागरिकांनी देखिल याकरिता प्रशासनाला सहकार्य करावे. अतिमहत्वाच्या कामाशिवाय नातेवाईक व इतर पाहुणे मंडळींना शहरात बोलवू नये तसेच महत्वाच्या कामाशिवाय शहराबाहेर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like