Lonavala : गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई; सव्वा लाखाचा दारूसाठा नष्ट

एमपीसीन्यूज : येथील औंढे गावाच्या हद्दीमधील खाडे वस्तीच्या मागील बाजूला असलेल्या एका गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी धडक कारवाई करत गावठी हातभट्टीचे 45 बॅरल जप्त करून ती दारू नष्ट केली. सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा हा मुद्देमाल होता.

औंढे गावाच्या हद्दीत अक्षय राजपूत नावाची व्यक्ती गावठी हातभट्टी लावून दारू बनवत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीणच्या पोलीस पथकाने आज, शुक्रवारी अचानक धाड टाकत 45 बॅरल (4500 लिटर) गावठी हातभट्टीचा साठा नष्ट केला. तसेच सदर 45 बॅरल व 100 किलो जाळायची लाकडे हा साठा देखिल नष्ट केला.

लोणावळा ग्रामीण भागात झालेली ही मोठी कारवाई आहे. गावठी हातभट्टी बनविणारे ठग ग्रामीण भागात नदी नाल्यालगतच्या पानवट्यावर दारू बनविण्याचा उद्योग करतात.

कोठे गावठी हातभट्टी बनवली जात असल्यास संबंधित गावचे पोलीस पाटील, सरपंच व नागरिक यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.