Lonavala : लॉकडाऊनचा सदुपयोग; तरुणांच्या मेहनतीने वलवण तलाव झाला ‘जलपर्णी मुक्त’

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा उपक्रम

एमपीसीन्यूज : वलवण गावाची शान असलेला वलवण तलाव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंधरा दिवस मेहनत करून जलपर्णी मुक्त केला आहे. लाॅकडाऊन काळात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी ह्या तलावातील जलपर्णी काढत तलावाला गतवैभव मिळवून दिले.

वलवण गावात शासनाच्या मालकीचा तलाव आहे. गावाच्या मध्यावर हा तलाव असल्याने ते गावाचे मुख्य आकर्षण आहे. काही वर्षापुर्वी या तलावातील जलपर्णी काढत त्याला स्वच्छ करण्यात आले होते. गावातील गणपती तसेच देवीचे विसर्जन, मोहरम विसर्जन याच तलावात केले जाते.

तलावात मासे देखिल असल्याने सकाळ संध्याकाळ नागरिक तलावाच्या काठावर बसून माश्यांना खाऊ घालतात. ज्येष्ठ मंडळी तलावाच्या भवताली असलेल्या ‘वाॅक वे’ वर चालतात, बाकड्यांवर बसतात असे नयनरम्य दृश्य असताना गत काही दिवसांपासून तलावात पुन्हा जलपर्णी वाढत होती.

जलपर्णीमुळे हा तलाव हिरवागार झाला. कोरोनामुळे नगरपरिषदचे कामकाज ठप्प झाले. त्यामुळे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वलवण गावातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सलग पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ तलावात उतरून सर्व जलपर्णी काढून टाकली.

आता तलाव पुन्हा पुर्वीसारखा पाण्याने भरलेला पहायला मिळत आहे. लाॅकडाऊनच्या काळात युवकांनी चांगला उपक्रम राबविल्याने गावकरी देखिल मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.