Lonavala : नगरशेठ… चित्रपट निर्माते… ते… पर्सवाले गुगळे !

(सुनील कडुसकर)

एमपीसी न्यूज- चित्रपट अभिनेते जितेंद्र व नंदा यांची प्रमुख भूमिका असलेला ”परिवार’’, अपर्णा सेन आणि जितेंद्र यांचा ”विश्वास’’ तर ड्रिम गर्ल
हेमामालिनी आणि शशिकपूर यांना घेऊन बनविलेला ”जहाँ प्यार मिले’’ अशा चित्रपटांचे निर्माते व लोणावळ्यातील प्रसिद्ध ” अहेरा’’ या ब्रँडच्या
पर्सचे जनक मनसुखलाल आनंदराम गुगळे (वय 81) यांचे लोणावळा येथे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. अहमदनगर येथे ” नगरशेट’’ म्हणून परिचित असलेल्या आनंदराम जीवराज गुगळे या सावकाराच्या घरात जन्मलेल्या मनसुखलाल यांना 81 वर्षाच्या आपल्या जीवनात सतत संघर्षच करावा लागला. नगरशेटचा मुलगा म्हणून मिरवण्याचे भाग्य त्यांना फार काळ लाभलेच नाही. एखाद्या कौटुंबिक चित्रपटात शोभून दिसावी अशी सतत अवहेलना होणाऱ्या व रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या नायकाची भूमिकाच त्यांच्या वाट्याला आली. परंतु, त्यामुळे खचून न जाता मोठ्या चिकाटिने व जिद्दीने या अंधकारमय परिस्थितीतूनही त्यांनी आपली प्रकाशवाट शोधली.

नगरच्या खिस्ती गल्लीतील ‘सुंदर सदन’ ही इमारत व त्यासमोरील ‘आनंद भवन’ हा वाडा गुगळे यांचाच होता. असे म्हणतात की, लंडनच्या प्रसिद्ध आर्किटेक्टने या सुंदर सदनचे आरेखन केले होते. आनंद भवन या वाड्यात गुगळे यांच्या गायी- म्हशींचा गोठाही होता. आज त्याच जागेवर नगरचे ”सप्तक सदन’’ हे प्रसिद्ध मंगल कार्यालय उभे आहे. विविध प्रकारच्या व्यवसायात आणि व्यापारात गुंतलेल्या गुगळे कुटुंबाने शेवटी नगरमध्ये सावकारी सुरू केली. त्यात त्यांनी मोठे यशही संपादन केले.त्यातूनच नगरशेट अशी त्यांची ओळख निर्माण झाली. सावकारी करीत असतानाच त्यांनी चित्रपटांना वित्तसहाय्य व त्यांचे वितरणाचा व्यवसाय सुरु केले. त्यात त्यांचा जम बसत असतानाच बॉलिवूडमधील काही बड्या मंडळींनी त्यांना चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्याची गळ घातली. परिवार, विश्वास आणि जहाँ प्यार मिले अशा तीन चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. परंतु, दुर्दैवाने हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटले. व्यापारात व सावकारी व्यवसायात जे काही कमावले ते नगरशेट गुगळेंनी या चित्रपटांमध्ये गमावले. ते कर्जबाजारी झाले. ज्या नगरमध्ये नगरशेट म्हणून राज्य केले तेथे कर्जबाजारी अवस्थेत राहणे आनंदराम गुगळे यांना कठीण वाटू लागले. त्यामुळे आपल्या सावकारी पेढीचा व व्यवसायाचा गाशा गुंडाळून त्याची सूत्रे त्यांनी मोतीभाऊ फिरोदियांकडे सोपविली. आपल्या तरुण मुलाबरोबरच चार अविवाहित मुली व नातवंडांना घेऊन गुगळे मुंबईला निघाले.

मुंबईला पाली हिल येथे धर्मेंद्र ज्या इमारतीत रहात होते. त्याच इमारतीत गुगळे यांचाही फ्लॅट होता. चित्रपट निर्माते लेखराज टंडन यांच्या स्टेशन व्हॅगेन मधून मुंबईला जात असताना दुपारच्या जेवणासाठी म्हणून ते लोणावळा येथील प्रसिद्ध चंद्रलोक हॉटेलमध्ये थांबले. नगरच्या भल्या मोठ्या इमारतीत रहात असल्याने एवढ्या मोठ्या कुटंबाला पाली हिलवरील छोट्या फ्लॅटमध्ये कसे ठेवायचे याची विवंचना होतीच. चंद्रलोक हॉटेलमध्य़े जेवत असताना ही व्यथा त्यांनी आपल्या एका परिचितांकडे बोलून दाखविली. त्यांचे हे बोलणे ऐकून लोणावळ्यात इस्टेट एजंट म्हणून कार्यरत असलेल्या कै. पंड्या यांनी त्यांना लोणावळ्यातच एक बंगला भाड्याने मिळवून देण्याचा प्रस्ताव ठेवला. जेवण उरकल्यावर ही स्टेशन व्हॅगन घेऊनच ते जुना खंडाळा परिसरातील हवाबाई यांच्या बंगल्यावर दाखल झाले व नंतर तेथेच स्थायिक झाले.

लोणावळ्यात तळ ठोकल्यानंतर खरा प्रश्न होता चरितार्थाचा. आनंदराम गुगळे यांनी तर हताश होऊन सर्व काही सोडून दिले. परंतु, मनसुखलाल यांनी उमेद सोडली नाही. चित्रपटांसाठी ज्यांना अर्थसहाय्य केले होते, अशांकडून पैसे वसुलीसाठी त्यांच्या दररोज मुंबईच्या वाऱ्या सुरु झाल्या. प्रसिद्ध गायक किशोरकुमार, अभिनेत्री मीनाकुमारी, खत्री, केवल पी. कश्यप, एन. एम. सिप्पी अशा अनेकांना त्यांनी चित्रपटांसाठी फायनान्स केले होते. परंतु, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात त्यांना फारसे यश येत नव्हते.

मुलांचे शिक्षण, चार बहिणी व वृद्ध वडिलांचा सांभाळ करण्यात त्यांची तारांबळ उडत होती. संसाराचा हा गाडा चालविण्यासाठी त्यांनी सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीनमध्ये सँडविचेस विकले. रेल्वेचे कँटिनही चालवून पाहिले. आरे दुधाची एजन्सीही घेतली. पण कोठेच म्हणावे असे यश मिळत नव्हते. संसाराला हातभार लावण्यासाठी मनसुखलाल यांच्या पत्नी कमला यांनी शिवणकाम शिकून घेतले व त्यातून जमेल तसे त्याही संसाराचा गाडा खेचण्याचा प्रयत्न करू लागल्या. आपली मुले शिकतील, स्वतःच्या पायावर उभी राहतील व पुन्हा सर्व काही ठीक होईल, या आशेवर गुगळे दिवस कंठत होते.

स्लिपर्स कव्हरमुळे पर्सच्या व्यवसायात….

समोर आलेली संधी ओळखून तिचा मागोवा घेणारे आपल्या उद्दीष्टाप्रत पोहोचतातच, असे जे सुभाषित आहे त्याची प्रचिती गुगळे यांना या पर्सच्या व्यवसायात आली. तसे म्हटले तर एका अगदी साध्या घटनेने त्यांना हा व्यवसाय मिळाला. हेमा ही मनसुखलाल यांची ज्येष्ठ कन्या. कलेची आवड असल्याने दहावीनंतर तिने मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश घेतला. तेथील होस्टेलवर जाण्यासाठी बँग भरत असताना आईने घरात पडलेल्या एका ज्यूटच्या कापडापासून स्लिपर ठेवण्यासाठी पिशवी तयार केली. इतक्या कलात्कम बँगमध्ये स्लिपर ठेवणे हेमाला पटेना. त्यामुळे तिने तिचा वापर पर्स म्हणून करायला सुरुवात केली. तिची ही आगळी वेगळी व आकर्षक पर्स तिची मैत्रीण, लोणावळ्याच्या मगनलाल चिक्कीचे संचालक कै. मोहनशेठ आगरवाल यांची कन्या गीता आगरवाल (सध्या मुंबईच्या चर्चगेट येथील सम्राट हॉटेलच्या संचालक गीता गुप्ता) हिला खूपच भावली. तिनेही हट्टाने तिच्याकडून तशीच दुसरी पर्स करवून घेतली. त्यानंतर आपल्या अन्य मैत्रिणींना देण्यासाठीही तिने हेमाच्या आईकडून अशाच पर्स तयार करवून घेतल्या व येथूनच खरे तर गुगळे यांच्या ‘अहेरा एंटरप्रायझेस’ (अशोक, हेमा आणि राजेश या गुगळे यांच्या मुलांच्या नावाचे अद्याक्षर वापरून ठेवलेले नाव) या पर्सच्या व्यवसायाची पायाभरणी झाली.

आपल्या ज्यूटच्या पर्स लोकांना भावतात हे लक्षात आल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्पादन सुरु केले. हेमाने तर आपल्या कॉलेजमधील
मैत्रिणींबरोबर, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये तसेच मुंबईतील एशियाटिक डिपार्टमेंट स्टोअर्स, अमरसन्स, फिल्म डिव्हिजन अशा अनेक ठिकाणी त्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. एन. एन. सिप्पी यांनीही आपल्या ‘फिर वही रात’ या चित्रपटाच्या प्रिमियरचे पासेस वाटण्यासाठी गुगळे यांना ज्यूटच्या पर्ससाठी दहा हजार रुपयांची भली मोठी ऑर्डर दिली. जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकणाऱ्या हेमाने कमर्शियल आर्ट करणाऱ्या आपल्या मैत्रिणींकडून या पर्सवर छापण्यासाठी सुंदर असे स्क्रीन प्रिटिंग करवून घेतले. या पर्सही सर्वांना खूप आवडल्या. या मोठ्या ऑर्डरमुळे गुगळे
कुटुंबाला व्यवसायाची नवी वाटच सापडली. सिप्पीकडून आलेल्या पैशातून त्यांनी पर्ससाठी लागणारा कच्चा माल खरेदी केला व लोणावळ्यातील काही होतकरू तरुणींना हाताशी घेऊन पर्सच्या व्यवसायाचा श्री गणेशा केला.

शनिवार, रविवारच्या सुटीसाठी शुक्रवारी रात्रीच हेमा लोणावळ्यात यायची. आपल्या कल्पनेतून ती पर्सच्या नवनव्या डिझाईन्स तयार करायची, नंतर सारे गुगळे कुटुंब रात्रंदिवस तशा पर्स तयार करायच्या कामात गढून जायचे. सोमवारी सकाळी डेक्कन क्वीनने हा सारा माल हेमा व तिचे वडिल विक्रीसाठी मुंबईला न्यायचे. गुगळे कुटुंबाला पर्सच्या या व्यवसायाने नवीन ओळख दिली. व्यवसाय वाढत गेला तसा त्याचा विस्तारही वाढला. पर्स विक्रीसाठी त्यांनी मुंबईतील अब्दुल रहिमान स्ट्रीटवर दुकानही थाटले. या दुकानाची जबाबदारी इंजिनियर झालेल्या अशोकने स्वीकारली, त्यामुळे पर्सची मागणी वाढली. त्यामुळे लोणावळ्यातील पर्सच्या कारखान्यात लोणावळ्यातील दहा- बारा महिलांना रोजगारही उपलब्ध झाला. 2009-10 पर्यंत मनसुखलाल नियमितपणे न थकता मुंबईला पर्स नेण्याचे व त्या विकण्याचे काम करत होते. परंतु, नंतर लोणावळ्याच्या बंगल्यातच पर्ससाठी ग्राहकांच्या रांगा लागू लागल्याने त्यांनी आपले लक्ष लोणावळ्यातील व्यवसायावर केंद्रीत केले होते. या साऱ्या वाटचालीत मनसुखलाल यांना जवळचे नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडून अनेक बरे- वाईट अनुभव आले परंतु, त्यामुळे खचून न जाता त्यांनी आपली वाटचाल सुरुच ठेवली. त्यामुळेच नगरशेठ असलेले गुगळे पर्सवाले गुगळे झाले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like