Lonavala : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुकशुकाट; लोणावळा शहरात ‘जनता कर्फ्यू’ला शंभर टक्के प्रतिसाद

एमपीसी न्यूज – ‘जनता कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला. तसेच लोणावळा शहरातील सर्व व्यावहार आज बंद ठेवत ‘जनता कर्फ्यू’ला शंभर टक्के पाठिंबा देण्यात आला.

कोरोना या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई पुणे ठाणे या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्याकरिता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच देशभरातील जनतेने आज ‘जनता कर्फ्यू’ पाळत घराबाहेर न पडण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. याचा परिणाम मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर देखील झाला आहे.

नागरिक तसेच पर्यटक घराबाहेर पडत नसल्याने सतत वर्दळीचा असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ओस पडला आहे. रस्त्यावर अतिशय तुरळक वाहतूक असून खंडाळा घाट परिसर देखील मोकळा पहायला मिळत आहे.

लोणावळा शहरातील सर्व प्रकारची दुकाने, भाजीपाला, किराणा, हाॅटेल, पर्यटनस्थळे, रिक्षा व टॅक्सी सेवा बंद ठेवत नागरिकांनी घराबाहेर न पडता संयम पाळला. कोरोना या जिवघेण्या आजारातून सुटका करण्याकरिता घरात बसणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे हेच महत्वाचे असल्याने मोदी यांच्या आवाहनाने म्हंणा अथवा जीवाच्या भितीने पण नागरिकांनी घरात राहणे पसंत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.