Lonavala: शहरात कोरोना नियंत्रणात ठेवण्यात नगरपरिषदेला यश – श्रीरंग बारणे

Municipal Council succeeds in controlling Corona in the city - Shrirang Barne ; वैद्यकीय साहित्याकरिता आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

0

एमपीसी न्यूज – पुणे व मुंबईला जोडणारे  आणि राज्यातील मोठे पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा शहरात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात नगरपरिषदेला यश आले आहे. नागरिकांची शिस्त, पोलिसांचे निर्बंध आणि नगरपरिषदेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे लोणावळा शहर कोरोनाच्या विळख्यात आले नाही. यापुढेही सर्वांनी सहकार्य करुन कोरोनावर मात करावी, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

तसेच नगरपरिषदेला वैद्यकीय साहित्याकरिता राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही बारणे यांनी दिली.

लोणावळा शहरातील कोरोनाची परिस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) नगरपरिषदेत आढावा बैठक घेतली. भविष्यात रुग्णवाढ होऊ नये त्यादृष्टीने उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला विविध सूचना केल्या.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी  रवी पवार, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्ले,  माणिक मराठे, भरत हरपुडे, राजू बच्चे, नगरसेविका कल्पना आखाडे, प्रमोद गायकवाड, दिलीप दामुदरे, आरोही तळेगावकर, सुवर्णा अकोलकर, सुरेश गायकवाड, अंकुश देशमुख, तानाजी सुर्यवंशी, भगवान देशमुख बैठकीला उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले,  लोणावळा-खंडाळा राज्यातील मोठे पर्यटनस्थळ आहे. देशासह राज्याच्या विविध भागातील पर्यटक लोणावळ्यात येत असतात. पुणे आणि मुंबईला जोडणारे हे शहर आहे. अनेक   मुंबईकरांचे  लोणावळ्यात दुसरे घर आहेत.

त्यामुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढतील असे अपेक्षित धरले होते. पण, कोणीही लोणावळ्यातील  घरी आला तरी त्याला दहा दिवस क्वारंटाईन केले जात होते.

नगरपरिषदेने सुरुवातीपासून दक्षता घेतली. सॅनिटाझर फवारणी, नागरिकांमध्ये जनजागृती केली. लॉकडाउनचे कडक पालन केले. नगरपरिषदेने अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली.

कोरोनाची रुग्ण संख्या वाढू दिली नाही. अलीकडच्या काळात पाच ते सहा रुग्ण सापडले आहेत. पण, ते रुग्ण इतरांच्या संपर्कात आलेले  होते. यामध्ये स्थानिक रुग्ण नाहीत.

वैद्यकीय साहित्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आहे. डॉक्टर, नर्स मानधनावर घेतले आहेत. त्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक सहकार्य करण्याची मागणी  केली आहे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like