Lonavala News: उपजिल्हा रुग्णालयासाठी 41 कोटींचा निधी, आमदार शेळके यांनी दिले अजितदादांना धन्यवाद !

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सुमारे 41 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके व लोणावळ्याच्या नगरसेवकांनी आज (बुधवारी) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समक्ष भेट घेऊन त्यांना मावळवासीयांच्या वतीने धन्यवाद दिले.

लोणावळा शहरात 100 खाटांचे लोणावळा उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव 2012 पासूनच फक्त कागदावरच होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामाच्या मंजुरीसह 40 कोटी 94 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

आमदार शेळके तसेच लोणावळ्याच्या नगरसेविका शादान चौधरी, सेजल परमार, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे, जयश्री आहेर, माणिक मराठे, गौरी मावकर, उद्योजक मुकेश परमार आदींनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

लोणावळा नगरपरिषदेने 1969 मध्ये बाबासाहेब डहाणूकर हे 50 खाटांचे रुग्णालय सुरु केले होते. पण शहरातील वाढते नागरीकरण, परीसरात वाढलेली लोकसंख्या आणि शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यासाठी लोणावळा शहरात शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची आवशकता होती.

त्यामुळे हे रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मात्र मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते.

या उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लावण्यासाठी मागील वर्षभरापासून आमदार शेळके शासनदरबारी पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाच्या मंजुरीबरोबरच 40 कोटी 94 लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला.

त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे हे काम जलद गतीने होण्यास मदत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.