Lonavala News : डोंगरगाव – कुसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे स्थानिक महिलांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज – डोंगरगाव व कुसगाव या भागातील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे गुरुवारी (दि.12) कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके यांच्या उपस्थितीत, स्थानिक महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत आमदार सुनील शेळके यांनी 6 कोटी 90 लाख 62 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

डोंगरगाव -कुसगाव या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबावी, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली येऊन प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार शेळके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा करून जलजीवन मिशन अंतर्गत वाढीव डोंगरगाव -कुसगाव पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. यासाठी 6 कोटी 90 लाख 62 हजार 234 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर या व्यतिरिक्त आमदार शेळके यांच्या स्थानिक विकास निधीमधून डोंगरगाव येथे 1 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची उंच टाकी मंजूर करण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीसाठी लागणारी जागा इंदुबाई बाबुराव गाडे, सीताबाई पिलाजी ठोंबरे, गंगाताई कोकरे, शंकर गाडे, अनंता गाडे यांनी विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे.

या योजनेच्या माध्यमातून डोंगरगाव येथे 1 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची उंच टाकी बनविण्यात येणार आहे. केवरे वसाहत येथील नवीन 1 लाख 40 हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे रुपांतर 2 लाख 60 हजार लिटरमध्ये करण्यात येणार आहे. तर ओळकाईवाडी येथे 5 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे, भैरवनाथनगर येथे 2 लाख 50 हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी व केवरे वसाहत येथे 1 लाख 40 हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. या सर्व पाण्याच्या टाक्यांना जोडण्यासाठी व पाणी पुरवठा करण्यासाठी साधरणतः 30 किलोमीटर लांबीची पाईपलाईन देखील करण्यात येणार आहे.

यावेळी कुलस्वामिनी महीला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता वैशाली औटी, जिल्हा परिषद सदस्य कुसुम काशीकर,पंचायत समिती सदस्य राजश्री राऊत, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, लोणावळा शहर अध्यक्ष मंजुश्री वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब गुंड, गंगाताई कोकरे, सरपंच सुनील येवले, उपसरपंच स्मिता खोले, सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, संजय गांधी समितीचे सदस्य ज्योती मालपोटे, नगरसेविका संगीता शेळके, ग्रामपंचायत सदस्य जयश्री दळवी, सविता गायकवाड, अनिता दळवी, शुभांगी कोळसकर, राजश्री जोगळे, प्रदीप घोलप, सतीश चव्हाण, ज्ञानेश्वर वाघमारे, संजय गुंड, राजेश काटकर, गणेश गुंजाळ, वर्षा कडू, फरीन शेख, मंदाकिनी झगडे, शैला मोरे, सुजाता ठुले, नितीन सावळे, विशाल तिडके, संध्या सिंह, प्रदीप कोकरे, संगीता गायकवाड, नितीन मोरे, सुवर्ण भोसले आदी आजी-माजी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके यावेळी म्हणाल्या की, डोंगरगाव -कुसगाव या भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण होत होती, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.यामुळे महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली यावा अशी आमदार शेळके यांची मनापासूनची इच्छा होती. आणि निवडणुकीच्या अगोदर देखील त्यांनी महिलांना पाण्याची समस्या सोडविण्याचा शब्द दिला होता. त्यांनी आज दिलेला शब्द पूर्ण केला आहे. तसेच यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी ज्यांनी विनामोबदला जागा दिली आहे त्यासाठी मी मनापासून आभार मानते, असेही त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.