Lonavala News : पीएमआरडीएला विरोध करण्यासाठी कार्ला फाटा येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

एमपीसी न्यूज – पीएमआरडीएला विरोध करण्यासाठी आज कार्ला फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेतकर्‍यांनी एकविरा कृती समितीच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत 16 सप्टेंबर पर्यंत आपल्या हरकती सविस्तर दाखल करा, त्यावर सुनावणी घेऊन यथायोग्य बदल प्रारुप विकास आराखड्यात करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. रास्ता रोका आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूककोंडी झाली होती.

पीएमआरडीएने कार्ला व परिसरातील गावाचा विकास आराखडा तयार करताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्घतीने आरक्षणं टाकली आहेत. ही आरक्षण टाकताना भांडवलदारांच्या जमिनी वाचविण्यात आल्या असून केवळ शेतकरी वर्गाच्या जमिनींवर आरक्षण टाकण्यात आली आहेत. रस्ते, गार्डन, खेळाची मैदाने, माल साठवणूक क्षेत्र अशी विविध आरक्षणं तसेच नागरी वस्तीमध्ये हरित व वन क्षेत्र अशी आरक्षण टाकल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.

याविषयी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य भाई भरत मोरे व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे म्हणाले आमचा केवळ या विकास आराखड्याला विरोध नाही तर पीएमआरडीए लाच विरोध आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद असताना आता नव्याने पीेएमआरडीए ची गरज काय आहे असा प्रश्न उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.