Lonavala News : धनगर आरक्षणासाठी 16 ऑक्टोबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन

एमपीसी न्यूज – धनगर समजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने येत्या 16 ऑक्टोबर रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली.

धनगर आरक्षण लढा समन्वय समितीची राज्यव्यापी बैठक आज लोणावळ्यात पार पडली. या बैठकीला राज्यभरातून सकल धनगर समाजाचे 200 प्रतिनिधी उपस्थित होते.

माजीमंत्री आण्णा डांगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, आमदार रमेश शेंडगे, रामराव वडकुते, पोपटराव गावडे, समन्वयक गणेश हाके, नगरसेवक निखिल कविश्वर, बबन खरात, भरत कोकरे व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती असताना देखील सरकार अद्यादेश काढून समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. मग धनगर समाजाला अद्यादेश
काढून आरक्षण का दिले जात नाही. सरकार धनगर समाजावर अन्याय करत आहे. एकाला एक न्याय व दुसर्‍याला दुसरा न्याय हा प्रकार या राज्यात चालणार नाही.

शेंगडे म्हणाले येत्या 16 ऑक्टोबर रोजी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत सकल धनगर समाज राज्यभरात शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन करणार आहे. यानंतरही सरकारने समाजाला आरक्षण दिले नाही अथवा चर्चेसाठी बोलवले नाही तर पुढील काळात अतिशय तिव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असे सांगितले.

तसेच मागील अडीच तीन वर्षापासून रखडलेली पोलीस भरती न थांबवता ती प्रक्रिया पुर्ण करावी. मराठा समाजासाठी आरक्षित असलेल्या 13 टक्के जागा वगळून इतर 87 टक्के जागांवर भरती करावी. पोलीस भरतीसाठी तयारी करणार्‍या समाजातील तरुणांचे वय वाढत आहे. भरती थांबल्यास हजारो युवकांचे नुकसान होणार असल्याने शासनाने तात्काळ भरती प्रक्रिया करावी अशी मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.