Lonavala News : कोरोना महासर्वेक्षण अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत आज, मंगळवारी राबविलेल्या कोरोना महासर्वेक्षण अभियानाला लोणावळा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त शहराची बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. तर स्वंयसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली.

लोणावळ शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समूह संसर्गाप्रमाणे नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

याकरिता लोणावळा नगरपरिषद, शाळांचे शिक्षक, आशा सेविका, नगरपरिषद कर्मचारी, राजकिय पक्षांचे कार्यकर्ते व संघटनांचे पदाधिकारी यांना कोरोनादूत म्हणून नगरपरिषदेचे ओळखपत्र प्रदान करत तपासणी मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले होते.

सकाळी आठ वाजता झालावाडी कोविड केअर सेंटर येथे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते लोणावळ्यात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी देखील लोणावळ्यात या अभियानाला भेट देत तपासणी कामाची माहिती घेतली. आमदार सुनिल शेळके यांनी काही भागांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या.

लोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या अभियानाचा मोठा फायदा होईल, असे मत प्रांत संदेश शिर्के व मुख्याधिकारी रवी पवार यांनी व्यक्त केले.

तसेच नागरिकांनी लक्षणे दिसताच तात्काळ कोविड केअर सेंटर मध्ये स्वतःची तपासणी करून घ्यावी, अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास न घाबरतात तात्काळ उपचार घ्यावा व बरे व्हावे असे आवाहन देखील शिर्के यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.