Lonavala News : बंदच्या वायरल मेसेजमुळे लोणावळेकरांमध्ये संभ्रम

दरम्यान, असा कोणताही बंद अथवा कर्फ्यू लोणावळ्यात नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर 14 दिवस बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मिडियावर वायरल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, असा कोणताही बंद अथवा कर्फ्यू लोणावळ्यात नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोणावळा शहरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर लोणावळ्यातील व्यापारी व राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची मागील आठवड्यात प्राथमिक बैठक झाली. त्यानंतर आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली होती.

याबैठकीनंतर तुंगार्ली व जुना खंडाळा ग्रामस्थांकडून जनता कर्फ्यू पाळण्याचा विचार सुरू होता. मात्र, अंतिम निर्णय होण्यापुर्वीच सोशल मिडियावर काही मेसेज वायरल झाले. यामध्ये छेडछाड करत ‘लोणावळा शहर 14 दिवस बंद’ असे मेसेज फिरू लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, असा कोणताही बंद लोणावळ्यात नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून सर्वत्र अनलाॅकची प्रक्रिया राबवली जात असताना लोणावळा शहर लाॅकडाऊन करणे संयुक्तिक होणार नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. लोणावळा हे पर्यटनावर अवलंबून असलेले शहर आहे. लाॅकडाऊनमुळे शहराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हातावर पोट असणार्‍य‍ांवर आज खर्‍या अर्थाने उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे लाॅकडाऊनला बहुतांश नागरिकांचा विरोध आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.