Lonavala News: उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे सुधीर शिर्के दोन मतांनी विजयी, व्हीपवरून भाजपमध्ये उभी फूट

काँग्रेस उमेदवाराला पाठिंब्याच्या पक्षादेशाला भाजपच्या चार नगरसेवकांचे आव्हान

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुधीर दत्तात्रय शिर्के हे दोन मतांनी विजयी झाले. शिर्के यांना 14 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्या गौरी गणेश मावकर यांना 12 मते मिळाली. काँग्रेस उमेदवाराला पाठिंब्याच्या व्हीपवरून भाजपमध्ये उभी फूट पडल्याचे पहायला मिळाले.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी रवी पवार यांनी कामकाज प‍ाहिले.

शिर्के यांना नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, राजू बच्चे, दिलीप दामोदरे, आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुधीर शिर्के, सुवर्णा अकोलकर, संजय घोणे, मंदा सोनवणे या 14 जणांनी मतदान केले.

तर गौरी मावकर यांना शादान चौधरी, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, सुनील इंगूळकर, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, भरत हारपुडे, अर्पणा बुटाला, जयश्री आहेर, गौरी मावकर, सेजल परमार, अंजना कडू या 12 जणांनी मतदान केले.

लोणावळा नगरपरिषदेची चार वर्षापूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नगरपरिषदेत भाजपा, काँग्रेस, आरपीआय व अपक्ष यांची आघाडी तयार झाली होती तर शिवसेना व अपक्ष विरोधी बाकावर बसले होते. दरम्यानच्या काळात भाजपात पक्षीय वाद झाल्याने चार नगरसेवकांनी विरोधी बाकावर बसणे पसंत केले.

आजच्या निवडणुकीत चार वर्षापूर्वी ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी काँग्रेसचे उमेदवार सुधीर शिर्के यांना मतदान करावे, असा व्हीप (पक्षादेश) भाजपाचे गटनेते देविदास कडू यांनी बजावला होता, मात्र काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात भाजपाच्या नगरसेविका गौरी मावकर यांनी अर्ज भरलेला असताना काँग्रेसला मतदान करणे हे भाजपा पक्षाच्या दृष्टीकोनातून घातक आहे.

केंद्रात व राज्यात काँग्रेस हा भाजपाचा विरोधी पक्ष असताना लोणावळ्यात भाजपा काँग्रेसच्या सोबत सत्तेत बसली आहे. भाजपा गटनेत्याने सदरचा व्हीप तात्काळ रद्द करावा, अशी मागणी भाजपा नगरसेवक भरत हारपुडे, गौरी मावकर, अर्पणा बुटाला व जयश्री आहेर यांनी केली आहे. दरम्यान पक्ष विरोधी भूमिका घेणार्‍या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे देविदास कडू यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III