Lonavala News : देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे : छगन भुजबळ

एमपीसीन्यूज : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर महाराष्ट्रात भाजपाने चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली असताना दुसरीकडे ओबीसी नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे. भुजबळ म्हणाले पक्ष कोणता आहे, काही फरक पडत नाही, जो जो ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भांडतोय आम्ही त्यांचे स्वागत करतोय. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, सर्व श्रेय त्यांनी घ्यावं पण आमचं आरक्षण वाचवावं असं मी त्यांना म्हटलो आहे असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी आज लोणावळ्यात सुरू असलेल्या ओबीसी व्हीजेएनटी न्याय हक्क समितीच्या चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केला.

यावेळी व्यासपीठावर मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माणिकराव ठाकरे, बबनराव ढाकणे, नारायण मुंडे, बाळासाहेब सानप, ईश्वर बाळबुधे, अरुण खरमाटे, साधना राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या अद्यादेशावर सही झाली असती तर आरक्षण टिकलं असतं असं जर कोणी म्हणत असेल तर ते साफ खोटं आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या समितीने 2010 साली लागू केलेल्या अटीचा समावेश नव्हता. देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर आरोप करून समाजाची दिशाभूल करू नये.

2010 सालापासून ह्या विषयाला सुरूवात झाली. 2016 साला देशातील सर्व ओबीसींचा इम्पिरियल डाटा गोळा करून केंद्राकडे देण्यात आला. त्यावेळी केंद्रात मोदी सरकार होते. 2019 साली खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी निती आयोगाला पत्र लिहून तो डाटा मागितला. पंकजा मुंडे यांनी देखील मागितला मात्र केंद्राकडून तो देण्यात आला नाही.

आता आमचं सरकार येऊन पंधरा महिने झाले. पण आमचा कालावधी कोरोनात गेलाय, घरोघरी जाऊन डाटा कसा गोळा करणार, केंद्राची देखील 2021 ची जनगणना आजून सुरू झालेली नाही. ज्यांच्याकडे समाजाचा डाटा आहे ते द्यायला तयार नाहीत. केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने मी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑर दिली आहे. त्यांनी केंद्राकडून तो डाटा आणून द्यावा. आरक्षणाचं सर्व श्रेय त्यांनी घ्यावं पण समाजाचं आरक्षण टिकवावं असं म्हंटलो आहे, असं यावेळी सांगितले.

तसेच मराठा आरक्षणावर बोलताना माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, मी फक्त ओबीसी अथवा इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे म्हटलो आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही असे त्यांनी नमूद केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.