Lonavala Crime News : पुणे जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना अटक; 25 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक व जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब नेवाळे यांना गोवित्री ग्रामविकास सोसायटीत बनावट मतदार यादी तयार करुन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत स्वतः उमेदवार असल्याचा बनावट प्रस्ताव मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल करून फसवणूक केल्याप्रकरणी कामशेत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 25 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे गटसचिव संजय ढोरे यांनी काल कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर कामशेत पोलिसांनी आज नेवाळे यांना अटक करत न्यायालयात हजर केल्याने इतर वेळी गुन्ह्यांकडे कानाडोळा करणार्‍या कामशेत पोलिसांची तत्परता चर्चेचा विषय ठरली आहे.

पुढील महिन्यात होत असलेल्या पीडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या तोंडावर ही अटक झाली आहे.  बाळासाहेब नेवाळे यांच्यासह प्रकाश महादू गायकवाड, बापू बनाजी धडस (रा. कामशेत) व बाळू धाकलू आखाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रकाश महादू गायकवाड, बापू बनाजी धडस, बाळू धाकलू आखाडे अद्याप फरार आहेत.

कामशेत पोलीस ठाण्यात वरील सर्वांवर भा. द. वि. कलम 420, 464, 465,467, 468,471,34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐकेकाळचे अजित पवार यांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी नेवाळे यांची ओळख होती. विधानसभा निवडणूकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला व त्यांचे ग्रह फिरले असे म्हणालयला हरकत नाही. पक्ष बदलामुळे अजित पवार व नेवाळे यांच्यात दूरावा निर्माण झाला होता. तसेच सध्या राज्यात राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आहे व मावळात आमदार देखील राष्ट्रवादी पक्षाचे असल्याने गुन्हा दाखल होताच भाजपमध्ये गेलेल्या नेवाळे यांना तातडीने अटक झाली असल्याची चर्चा नागरिक खाजगीत करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.