Lonavala News: लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी यांचे निधन 

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील ज्येष्ठ नेते, माजी उपनगराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तसेच मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय कोडिंबा गवळी (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज (शनिवारी) निधन झाले.
लोणावळा शहराच्या सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सर्वांच्या जिव्हाळ्याचे दत्ताभाऊ आज अचानक गेल्याने तालुक्यासह लोणावळा शहराचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
 कुशल संघटक व तडफदार नेतृत्व हरपल्याने काम करण्याच्या अनोख्या पध्दतीमुळे ते तालुक्यात सुपरिचित होते. परोपकार हा सर्वात मोठा गुण त्यांच्याकडे  होता. दत्तात्रय गवळी यांनी अनेक वर्षे लोणावळ्यातून बुलंद मावळ नावाचे साप्ताहिक चालविले. ते त्या साप्ताहिकाचे मालक व संपादक होते. त्यांच्या जाण्याने लोणावळा शहरावर शोककळा पसरली आहे.
युवा कार्यकर्ते गणेश व मनोज गवळी यांचे वडील तर उद्योजक संभाजी गवळी यांचे ते बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.