Lonavala News : लोणावळ्यात आज सात हाॅटस्पाॅट विभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – मागील मंगळवारी लोणावळा शहरातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाल्यानंतर आज लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सात हाॅटस्पाॅट विभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली आहे. मात्र याकरिता शहरात कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन करण्यात येणार नसल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले.

लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मागील मंगळवारी (दि.15) रोजी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत लोणावळा शहरात संपूर्णतः लॉकडाऊन पाळत शहरातील 40 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली होती. याच मोहिमेचा दुसरा टप्पा आज मंगळवारी (दि. 22) रोजी पार पडणार आहे.

भांगरवाडी, गवळीवाडा, सिद्धार्थनगर बाजारपेठ, हनुमान टेकडी, रामनगर, खंडाळा या सात विभागात सदरची मोहीम राबविण्यात येणार आहे. लोणावळा नगरपरिषद कर्मचारी, आशा वर्कर व काही मोजके स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होतील. नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेतून शहरातील कोरोनाची साखळी रोखण्यात मोठी मदत होणार आहे. याकरिता नागरिकांनी मनात कोणताही संकोच न बाळगता आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.