Lonavala News: लोणावळा शहर व परिसरात साध्या पद्धतीने गणपती-गौराईचे विसर्जन

सहा दिवस भक्तिभावाने सकाळ व सायंकाळी बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा करण्यात आली. तर सोन पावलांनी दोन दिवसांपूर्वी घरात आगमन झालेल्या लाडक्या गौराईचे घरोघरी स्वागत करण्यात आले.

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर व परिसरात गुरुवारी (दि.27) घरगुती गणपती बाप्पा व गौराईचे साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

आनंदाचा व चैतन्याचा सण असलेला गणेशोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. घराघरात बाप्पा विराजमान झाल्याने घरोघरी उत्साहाचे वातावरण होते. मात्र सार्वजनिक ठिकाणी यावर्षी गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने सुरू आहे.

सहा दिवस भक्तिभावाने सकाळ व सायंकाळी बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा करण्यात आली. तर सोन पावलांनी दोन दिवसांपूर्वी घरात आगमन झालेल्या लाडक्या गौराईचे घरोघरी स्वागत करण्यात आले. दोन दिवस तिला नानाविध प्रकारचे पक्वान्न व नैवेद्य अपर्ण करण्यात आले.

घरातील महिला व लहान मुलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. गुरुवारी लाडक्या बाप्पांना व गौराई देवीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

लोणावळा नगरपरिषदेने लोणावळा धरण, इंद्रायणी पुल येथील घाटावर विसर्जनाची तयारी केली होती. पुरंदरे शाळेजवळच्या क्रीडांगणावर विसर्जनासाठी घाट बनविण्यात आला होता. याठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलीस तैनात करण्यात आले होते. यासह वलवण, तुंगार्ली, नांगरगाव, खंडाळा, भुशी याठिकाणी स्थानिक बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

ग्रामीण भागात देखील वरसोली, वाकसई, कार्ला, वेहेरगाव, दहिवली, सदापुर, शिलाटणे, टाकवे, कुसगाव, ओळकाईवाडी, भैरवनाथनगर, कुसगाववाडी, डोंगरगाव व डोंगरगाववाडी, औंढे, औंढोली, देवले, पाटण, मळवली, बोरज, कुणेगाव, कुरवंडे या गावांमध्ये नदी, खाण, तळी, विहिर याठिकाणी सार्वजनिक मिरवणुका न काढता साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.