Lonavala News: लोणावळा शहरातील ‘वन वे’ उरलाय फक्त नगरपरिषद कार्यालयापुरता

वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज – लोणावळा बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शिवाजी महाराज पुतळा ते भांगरवाडी इंद्रायणी पूल या दरम्यान मागील काही वर्षापासून सुरू केलेला ‘वन वे’ सध्या केवळ नगरपरिषद इमारती पुरता उरला आहे. तर कोठेही वाहने उभी करण्याच्या वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे शहरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहे.

बाजारपेठेत दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या कमी व्हावी व स्थानिक नागरिकांना विना अडथळा बाजारपेठेत येता यावे व माघारी जाता यावे याकरिता मागील काही वर्षापासून शहरात वन वे सुरू करण्यात आला. मात्र भांगरवाडी इंद्रायणी पुलावर पोलीस कर्मचारी अथवा वाॅर्डन थांबत नसल्याने व नागरिक देखील बेशिस्तपणे वन वे मधून जात असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण भेटत आहे.

कुसगाव व भांगरवाडी भागातून बाजारात जाण्यासाठी इंद्रायणी पुलावरून पंडित नेहरू मार्गावरून पुरंदरे शाळा, शाळा क्रमांक 1 समोरील रस्ता व बाजारातून भांगरवाडी परिसरात येण्यासाठी मुख्य बाजारातील रस्त्यावरून येणे नागरिकांनी अपेक्षित असताना, चौकात पोलीस अथवा वाॅर्डन नाहीत हे पाहताच नागरिक सर्रासपणे ‘वन वे’ मधून वाहने घेऊन जातात.

रस्त्यात खरेदीसाठी कोठेही कशीही वाहने उभी करतात. आपल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे, याचे भान देखील या वाहनचालकांना नसते. रस्त्यात जागा दिसेल तिथे ‘यु-टर्न’ घेणे यामुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

लोणावळा बाजारभागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासोबत शहर पोलिसांना मदतनीस म्हणून नगरपरिषदेने 12 वाॅर्डन दिले आहे. मात्र हे वाॅर्डन शहरात कमी व इतरत्र जास्त असतात. चौकात असले तरी नियुक्त केलेल्या पाॅईटवर न थांबता कोठेतरी टपरीत थांबणे, रिक्षात बसणे, मोबाईलवर खेळत बसणे, असे प्रकार दिसून येत आहेत.

लोणावळा नगरपरिषद प्रशासन व पोलीस यंत्रणेने या वाॅर्डन मंडळींकडून योग्य प्रकारे काम करून घेतल्यास शहरातील वाहतूक समस्या काही प्रमाणात निश्चितच कमी होईल, यात शंका नाही. तसेच वाहनचालकांनी देखील बेशिस्तीचे प्रदर्शन न करता वाहतूक नियमांचे व ‘वन वे’ चे पालन करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.