Lonavala News : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात तिसरा क्रमांक

मागील तीन वर्ष लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभाग घेत राष्ट्रीय नामांकन मिळविले आहे.

एमपीसीन्यूज : देशभरात सर्वत्र र‍ाबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये लोणावळा नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील तीन वर्ष लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभाग घेत राष्ट्रीय नामांकन मिळविले आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3898 व 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेने तिसरा क्रमांक मिळविला.

यापुर्वी 2018 साली लोणावळा नगरपरिषद स‍ातव्या व 2019 साली दुसर्‍या क्रमांकावर होती.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने 163 कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, संस्थांमधील पुरुष, महिला व मुले मिळून 18 हजार 302 जणांनी सहभाग नोंदविला होता.

शौचालय सुविधेच्या बाबतीन 2019 साली लोणावळा नगरपरिषदेला ODF+ व 2020 साली ODF++ दर्जा मिळाला आहे. शहरात 40 सार्वजनिक शौचायले (430 सिटस) असून यापैकी 10 शौचालयांना स्टार दर्जा प्राप्त आहे. या व्यतिरिक्त वैयक्तिक 524 शौचालयांसाठी अनुदान देण्यात आले होते.

घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी नगरपरिषदेने जिपीएस प्रणालीद्वारे वाहनांचे नियोजन केले आहे. 2019 व 2020 या दोन वर्षात शहराला कचरामुक्त शहर (3 STAR CITY) दर्जा मिळाला आहे.

लोणावळा शहराला कचरामुक्त व स्वच्छ बनविण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, पत्रकार संघ, नागरिक, हाॅटेल, बचतगट, महिला मंडळे यांनी सहभाग घेतला होता.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तत्कालिन मुख्याधिकारी सचिन पवार, माजी स्वच्छता व आरोग्य सभापती संध्या खंडेलवाल यांनी शहरवासीयांना आवाहन करत पथनाट्ये सादर केली. कापडी पिशव्या तसेच 15 हजार डस्टबीनचे नागरिकांना वाटप केले.

शाळांमध्ये पासबुक योजना, रिक्षांमध्ये डस्टबीन बसविले, उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई, स्वच्छता मॅरेथॉन, घरगुती पद्घतीने कचर्‍यापासून खत निर्मिती असे विविध उपक्रम राबविले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.