Lonavala News : श्री एकविरा देवीच्या कार्ला गडावर महानवमी होम संपन्न

एमपीसी न्यूज – लोणावळ्याजवळील कार्ला डोंगरावर आज पहाटे 3 वाजता श्री एकविरा देवीचा महानवमी होम संपन्न झाला. प्रशासकीय समितीच्या आदेशान्वये यावर्षी प्रथमच तीन भाविक दाम्पत्यांना होमाला बसण्याचा मान मिळाला.

वेहेरगावातील ज्येष्ठ नागरिक असलेले ज्ञानोबा भिकाजी देवकर व सोनाबाई ज्ञानोबा देवकर, नविन दाम्पत्य असलेले सत्यवान म्हात्रे व पुजा म्हात्रे तसेच दिव्यांग असलेले विलास गोपाळ रसाळ व सुर्वणा विलास रसाळ यांना हा मान मिळाला. महानवमी होम संपन्न झाल्यानंतर उपारणे, धोतर व श्रीफळ देऊन या तिन्ही दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व देवस्थाने बंद असल्याने त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी कार्ला गडावर देखील करण्यात आली होती. श्री एकविरा देवस्थान प्रशासकीय समितीचे अध्यक्ष तथा वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश संजय मुळीक, सचिव तथा मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे व धर्मदाय आयुक्त राहुल चव्हाण यांनी यावर्षी महानवमीच्या होमाला भाविक वर्गातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व नवदांपत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार आज वरील तीन दाम्पत्यांच्या हस्ते देवीचा महानवमी होम झाला. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय मुळीक य‍ांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

कोरोनामुळे मंदिरे भाविकांसाठी बंद असली तरी गडावर देवीचे सर्व कार्यक्रम विधीवत पार पडले. आज महानवमी होमाच्या दर्शनाची संधी मिळेले या आशेने रात्रभर कोकण भागातील भाविक तसेच स्थानिक गडाकडे येत होते मात्र कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला नाही. भाविकांनी पायथा मंदिर व पहिल्या पायरीवर मस्तक टेकवत देवीचे आर्शिवाद घेतले.

नवरात्रीचे नऊ दिवस कार्ला गड व वेहेरगाव परिसरात लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रनवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. श्री एकविरा देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळू गायकवाड व कर्मचारी यांनी गडावर चोख व्यवस्था ठेवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.