Lonavala News: मळवलीत खाजगी बंगल्यात जोरात गाणी लावून नाच आणि ‘दौलतजादा’, चार तरुणींसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई व विजापूरच्या व्यापाऱ्यांसह चार महिलांना अटक, 51 हजार रोख रकमेसह एक लाख 40 हजारांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – मळवली येथील समृद्धी बंगला या ठिकाणी स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून नाचणार्‍या महिला व त्यांच्यावर दौलतजादा म्हणजेच पैशाची उधळण करणारे पुरुष अशा नऊ जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मळवली येथील समृद्धी बंगल्यात सदरचा प्रकार सुरू असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस नाईक विजय रहातेकर, पोलीस क़ॉन्स्टेबल शरद जाधवर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रूपाली कोहिनकर यांनी दोन पंचासह घटनास्थळी जाऊन खात्री करून रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी छापा टाकला.

त्या ठिकाणी चार महिला स्पिकरवरील गाण्याच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या व पाच पुरुष त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचे आढळून आले.

राजेश पारसमल जैन (रा. लॅमिंग्टन रोड, मुंबई), महेश छगनलाल पोरवाल, विनोद कुमार मोहनलाल भन्साळी, सचिन रमेश जैन व राकेश मदनलाल पोरवाल (सर्वजण रा. विजापूर, कर्नाटक) अशी या ठिकाणी महिलांवर पैसे उधळणार्‍या इसमांची नावे आहेत.

त्यांच्या ताब्यातील व नाचणार्‍या महिलांवर उधळलेले असे 50 हजार 880 रुपये रोख, मोबाईल, स्पीकर असे एकूण 1 लाख 40 हजार 880 रुपयांचा माल रोख रकमेसह जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील पाच जणांसह चार महिलाच्या विरुद्ध भादंवि कलम 294, 188, 269 साथीचे रोग नियंत्रण कायदा सन 1897 चे कलम 3 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 33(N)/131 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.