Lonavala News : समुद्रा कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम

रुग्णांचे मनोबल वाढण्यास होतेय मदत

एमपीसीन्यूज : टाकवे गावातील समुद्रा कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना मनोरंजनासाठी संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पिलो पास, गीत गायन अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करत विजयी स्पर्धकांना विविध बक्षिसे दिली जात आहेत. तसेच रुग्णांचा वाढदिवस देखील केक कापून उत्साहात सर्वजण साजरा करत आहेत. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मनोबल उंचावण्यास मदत होत आहे.

कोरोना हा साधा साथीचा रोग असून या आजाराविषयी नागरिकांच्या मनात असलेली भिती घालविण्यासोबत रुग्णांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रबोधनपर व्याख्याने, आरोग्य चांगले रहावे यासाठी दररोज सकाळी योगा व प्राणायाम असे कार्यक्रम विविध योगगुरु व मनशक्ती केंद्राच्या मार्फत दिले जात असल्याची माहिती डाॅ. गुणेश बागडे यांनी दिली.

या सर्व उपक्रमांमुळे रुग्णांच्या मनातील भिती दूर होऊन मनोबल वाढले जात आहे. कार्यक्रमांमधून विरंगुळा होत असल्याने रुग्ण कधी बरे होतात हे त्यांनाही कळत नाही.

या उपक्रमांमुळे मानसिकरित्या हे सर्व रुग्ण मजबूत झाले असल्याचे जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियम व अटीचे पालन करत या विविध उपक्रमात लहान मोठे सर्वच रुग्ण सहभागी होताना दिसत आहे.

हे सर्व उपक्रम मावळ उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे, मावळ आरोग्य आधिकारी चंद्रकांत लोहारे, मावळ आरोग्य समन्वयक गुणेश बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद सोनवणे, आर. आर. चव्हाण, सीमा शिंदे, सुहास सिंघन, प्रियांका खराडे, डाॅ. सर्जेराव गिरवले, आरोग्यसेविका लक्ष्मी धोत्रे, आरोग्यसेवक आशिष खोब्रागडे, जावेद भाई, अक्षय भाऊ व कोविड सेंटर मधील सर्व कर्मचारी घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.