Lonavala News : ‘शिवदुर्ग मित्र’ची हिमाचल प्रदेशातील ‘शोशाला पीक’ मोहीम यशस्वी

एमपीसी न्यूज – सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये क्लायम्बिंग केल्यानंतर आता ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ या टीमने थेट हिमालयात मजल मारली आहे. टीमने हिमाचल प्रदेशातील ‘शोशाला पीक’ क्लायम्बिंग मोहीम नुकतीच फत्ते केली आहे. हिमालयाच्या डोंगररांगेतील शिवदुर्गची ही पहिली मोहीम ठरली आहे.

शिवदुर्ग टीमने आजवर सह्याद्रीत क्लायम्बिंग केले. पण आता हिमालयात क्लायम्बिंग करण्याच्या निर्धाराने पहिली मोहीम हिमाचल प्रदेश मधील रक्षम गावातील बास्पा व्हॅली येथे काढण्याचे ठरले. बास्पा व्हॅली मधील शोशाला पीक या शिखरावर जाण्याचे ठरले. ही मोहीम शिवदुर्गसाठी खूप महत्वाची होती. कारण आजवर भारतातील कोणीही शोशाला पीक या शिखरावर गेले नव्हते. त्यामुळे शिवदुर्गने केलेली शोशाला पीक मोहीम ही पहिली भारतीय मोहीम ठरली आहे.

सलग बारा दिवस चाललेल्या या मोहिमेत टीमला पाऊस, थंडीचा खूप सामना करावा लागला. शोशाला पीकचा क्लायम्बिंग रूट 750 मीटरचा आहे. तर या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून चार हजार 700 मीटर एवढी आहे. शिवदुर्गच्या टीमने हे शिखर यशस्वी पार केले आहे.

सचिन गायकवाड, संजय वांद्रे, सुनील गायकवाड, अशोक मते, राजेंद्र कडु, आनंद गावडे, महेश मसने, गणेश गिद यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. क्लायबिंग टीम रोहीत वर्तक, भुपेश पाटील, योगेश उंबरे, ओंकार पडवळ, समीर जोशी यांनी ही मोहीम फत्ते केली. मोहिमेत शिवम आहेर यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.