Lonavala News : पाटण येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी; पंचनामे करण्याचे आदेश

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील पाटण हद्दीत ओढ्यावर झालेली अतिक्रमण व त्यामुळे ओढावलेली पूरपरिस्थिती पाहता तातडीने ओढ्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची पाटण ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पाटण परिसरात पाहणी केली. तसेच नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मावळ तालुक्यात 23  जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत पाटण येथील राजाणा ओढ्याला पूर आला. या पुराचे पाणी घरकुल आणि परिसरातील ग्रामस्थांच्या घरात शिरले होते. तसेच शेती पिके आणि रस्त्याचे नुकसान झाले होते.

या पूरपरिस्थितीतीला ओढ्यावरील झालेली अतिक्रमणे कारणीभूत असल्याचा आरोप करीत ही अतिक्रमणे काढून टाकण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, भाविसे तालुका उपाध्यक्ष संतोष येवले व युवासेना उपतालुका अधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य विजय तिकोणे यांनी तहसीलदार मधुसूधन बर्गे यांना दिले होते. तसेच याबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनाही निवेदन देण्यात आले होते.

या मागणीची दखल घेत तहसीलदार बर्गे यांनी मंडलाधिकारी माणिक साबळे यांच्यासह पाटण आणि परिसरातील पूरपरिस्थिती आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून आवाहवाल सादर करण्याचे आदेश मंडलाधिकाऱ्यांना दिले. अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.