Lonavala News: खंडाळा तलावात लवकरच होणार नौका विहाराला सुरूवात

हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर खंडाळा परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळला होता.

एमपीसी न्यूज- येथील खंडाळा तलावातील नौका विहाराचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या खंडाळा तलावाचे सुशोभिकरणाचे काम 50 टक्के झाले असून सध्या या तलावात पर्यटकांसाठी नौका विहाराचा प्रकल्प लोणावळा नगरपरिषदेकडून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 बोटी नौका विहारासाठी नगरपरिषदेने खरेदी केल्या आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर खंडाळा परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळला होता.

लोणावळा नगरपरिषदेने घेतलेल्या स्वयंचलित व पायडल बोटीची चाचणी नुकतीच घेण्यात आली. यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, नगरसेविका पूजा गायकवाड, रचना सिनकर, विजय सिनकर, आशिष बुटाला, सामाजिक कार्यकर्ते अनंता थोरात, संतोष सपकाळ, रवींद्र कचरे पाटील, दत्तात्रय कचरे पाटील हे उपस्थित होते.

मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत देखील या विषयावर चर्चा होऊन हा प्रकल्प चालविण्यासाठी निविदा मागवून ठेका देण्याचा ठराव साधक बाधक चर्चा करून सर्वांनुमते मंजूर करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या सरोवर संवर्धन व सुशोभिकरण योजनेतून मागील पंचवार्षिक काळापासून या तलावाचे दुरुस्तीचे काम सुरू होते. निधीचा दुसरा टप्पा न आल्याने सध्या काम रखडले आहे. बोटिंग प्रकल्पामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल तसेच शहराचा पर्यटनात्मक विकासाला चालना मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.