Lonavala News : कामगारांना किमान वेतन 20 हजार मिळायला हवे – प्रविण दरेकर

एमपीसीन्यूज : कामगारांना किमान वेतन 20 हजार रुपये मिळायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लोणावळ्यात कामगार प्रतिनिधी मेळाव्यात केले.

शिवक्रांती कामगार संघटनेचा राज्यव्यापी कामगार प्रतिनिधी मेळावा आज लोणावळ्यात पार पडला. या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून शिवक्रांती कामगार संघटनेचे नवनिर्वाचित मुख्य सल्लागार प्रविण दरेकर यांनी कामगार प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ॲड. विजय पाळेकर, शिवाजी खटकाळे, शिक्षण समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, रायगड जिल्हा भाजपाचे सरचिटणीस विनोद साबळे, रमेश पाळेकर, रोहन आहेर, प्रथमेश पाळेकर, योगिता कोकरे, गुलाब मराठे, रविंद्र साठे, राजेंद्र पवार, हनुमंत कलाटे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दरेकर पुढे म्हणाले, आजच्या परिस्थितीत घर चालविण्यासाठी व मुलांच्या शिक्षणांसाठी किमान 15 ते 18 हजार रुपये लागतात, अशा काळात कामगारांना 10 ते 12 हजार किमान वेतन देऊन कसे चालेल. याकरिता कामगारांना किमान वेतन 20 हजार रुपये इतके मिळायलाच हवे.

शिवक्रांती कामगार संघटनेत काम करताना कामगारांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. पाळेकर यांचे कामगारांसाठी असलेले योगदान पाहून मी या संघटनेचे सल्लागार पद स्विकारले आहे. संवेदनशील नेता युनियनचे नेतृत्व करू शकतो, मुंबईत माथाडी कामगार, गिरणी कामगार यांची घरे करण्यासाठी मी काम केले आहे. आपल्या पाठिशी उभे राहून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करू, अशी ग्वाही दरेकर यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

कामगारांच्या गृहनिर्माण योजना आपल्या ताकदीवर करू. शासनाकडून एखादा भुखंड मिळाल्यास अल्पदरात कर्ज देऊन कामगार वसाहती उभ्या करू, असे सांगत असताना कामगारांचं भलं करायचं असेल तर आपलं सरकार यायला हवे हे सांगायला देखील ते विसरले नाही. सध्याचे सरकार कामगारांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. इच्छाशक्ती, प्रामाणिकता व संवेदनशीलता असल्यास कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, कामगारांच्या हितासाठी नि:स्वार्थपणे काम करणारी संघटना अशी शिवक्रांती कामगार संघटनेची ओळख आहे. संघर्षातून ही संघटना उभी राहिली आहे. कामगारांचा विश्वास संपादन करणे सहज सोपं काम नाही मात्र हे शिवधनुष्य शिवक्रांतीने पेलले आहे. कामगाराला केंद्रबिंदु माणून काम करणारी ही संघटना महाराष्ट्राचे नेतृत्व करेल यात शंका नाही. शिवक्रांती कामगार संघटनेचा प्रत्येक कामगार स्वतःच्या घरात राहिल हा इतिहास आपण घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विजय पाळेकर म्हणाले, मावळ तालुका व चाकण परिसर औद्योगिक हब झालेला असला तरी कामगार प्रश्नांसाठी पुण्यात जावे लागते. याकरिता चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार आयुक्तालयाची स्थापना व्हावी. कामगारांसाठी रुग्णालय व्हावे, घरकुल योजना व्हावी, तसेच कामगारांना न्याय लवलरात लवकर मिळावा याकरिता फास्टट्रक कोर्ट सुरू व्हावे, अशी मागणी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली.

पाळेकर पुढे म्हणाले, कामगारांना न्याय मिळवून देताना कंपनीवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली. त्यांना आवश्यक असलेले उत्पादन मिळवून दिले. समतोल साधल्याने संघर्ष करण्याची वेळ आली नाही.

मेळाव्याचे प्रास्ताविक संघटक रोहन आहेर व प्रतिक पाळेकर यांनी केले. रविंद्र साठे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1