Lonavala : विसापूर किल्ल्यावर अडकलेला तरुण शिवदुर्गच्या मदतीमुळे वाचला

एमपीसी न्यूज – माहिती नसलेल्या अवघड वाटेने विसापूर किल्ल्यावर चढत असताना एक तरुण रस्त्यातच एका अवघड टप्प्यावर अडकला. मागे-पुढे कुठेही जाता येत नसलेल्या टप्प्यावरून शिवदुर्ग मित्र लोणावळा या रेस्क्यू टीमने साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढले. अमर कोरे असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी (दि. 15) 8 – 10 तरुण भाजे लेणीच्या बाजूने विसापूर किल्ल्यावर जात होते. या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी अवघड मार्ग आहे. त्यामुळे त्या मार्गावरून कोणीही जात नाही. चढाई करत असलेल्या कोणालाही या मार्गाची पूर्ण माहिती नव्हती. पहिल्या टप्प्यापर्यंत सर्वजण सोबत होते. मात्र, त्यापुढे त्यांच्यात विभाजन झाले. काहीजण पुढे गेले तर काहीजण मागे राहिले. काहीजण रस्ता भरकटून जंगलात शिरले. नंतर वर किल्ल्याचा बुरुज दिसायला लागल्याने त्या दिशेने चालू लागले. काही अंतर चढून गेल्यावर अमर कोरे हा तरुण अशा अवस्थेत अडकला की वरही जाऊ शकत नाही व खाली ही उतरु शकत नाही.

दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कौशिक पाटील यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा या रेस्क्यू टीमला फोन करून विसापूर किल्ल्यावर तरुण अडकल्याची माहिती दिली. सोबतच त्यांनी तरुण अडकल्याचे लोकेशन आणि फोटो टीमला पाठवले. टीमने अमरला आहे त्या जागी घट्ट पकडून थांबून राहण्यास सांगितले. शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमने लोहगड विसापूर किल्ले परिसरातील मुलांना फोन करून तसेच सोशल मिडीयावर मेसेज केले.

भाजे लेणी परिसरात टीमचे सदस्य सागर कुंभार असल्याचे समजले. टीमने सागर यांना एक तरुण विसापूर किल्ल्यावर चढताना अडकल्याची पूर्ण माहिती दिली. सागर अर्ध्या तासात तरुण अडकलेल्या ठिकाणी पोहोचले. टीम देखील दुधीवरे खिंडमार्गे घटनास्थळी जात होती. लोहगड विसापूरच्या मध्ये गाय खिंडीतून पुढे मोटार जाणे शक्य नव्हते. सर्व टीम चालत विसापूरच्या दिशेने निघाली. काही वेळेत टीम देखील अमर पर्यंत पोहोचली.

सागर यांनी अमरला पकडून ठेवले होते. मात्र त्याची सुटका करण्यासाठी वेळ घालवून चालणार नव्हता. कारण पावसाची रिपरिप वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ता निसरडा होणार होता. त्यामुळे टीमने घाई केली. विकास मावकर खाली जाण्यासाठी तयार झाले. थांबलेल्या अचानक पावसाने रौद्र रूप धारण केले. विकास आणि सागर या दोघांच्या मदतीने अमर दोरीला पकडून सुरक्षित ठिकाणी उभा राहिला. टीमने त्याला हार्नेस घालून वर घेण्यात आले.

ही कामगिरी शिवदुर्ग टीमच्या विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री, पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने, हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे, अमित भदोरीया, दिनेश पवार, आनंद गावडे, सुनील गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.