Lonavala : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; अंगरक्षक, चालक किरकोळ जखमी

एमपीसी न्यूज – लोणावळ्याजवळ राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. द्रुतगती मार्गावर रविवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास औंढे पुलाजवळ हा अपघात झाला. सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झाली नसून धनंजय मुंडे सुरक्षित आहेत. तर, अंगरक्षक व चालक किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, लोणावळा येथील द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील कॅनव्हामधील वाहनाला (MH -44 T 7) अपघात झाला. यात व्यंकट गित्ते (चालक), संतोष जाधव (चालक) आणि सोपान चाटे (अंगरक्षक) हे जखमी झाले असून त्यांच्यावर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातग्रस्त वाहनामध्ये मुंडे स्वतः नव्हते तर, त्यापुढे असलेल्या दुसऱ्या वाहनामध्ये होते. या अपघातात धनंजय मुंडे यांना इजा झाली नसून ते सुरक्षितरित्या मुंबईला पोहोचले आहेत, असे मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांनी सांगितले आहे.

तर, आज मुंबईला जाताना माझ्या ताफ्यातील एका गाडीला लोणावळ्याजवळ छोटासा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडीत दोन चालक, एक अंगरक्षक होते. ते आणि मीही सुखरूप आहेत. इतर कुठल्याही बातमी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रभू वैद्यनाथाचे, गणरायाचे, राज्यातील १२ कोटी जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.