Lonavala : वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या 95 जणांवर दंडात्मक कारवाई; ई-चलनद्वारे आकारला 85 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज – लोणावळा येथे पर्यटनाला आल्यानंतर वाहतूक नियमांचा भंग करत वाहन चालविणे, लेनची शिस्त मोडणे असे प्रकार करणार्‍या 95 वाहनांवर शनिवारी कारवाई करत लोणावळा शहर पोलीसांनी ई-चलनद्वारे 85 हजारांचा दंड आकारला.

कुमार चौक, र‍ायवुड चौक आणि भुशी धरण मार्गावर ही कारवाई करण्यात आली. शनिवार आणि रविवार लोणावळ्यात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते.

  • धरणाकडे जाताना वाहनचालक सर्रासपणे वाहतुक नियमांचा भंग करत वाहने चालवितात, लेनची शिस्त मोडत वाहतूककोंडी करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे असे प्रकार करणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये काही रिक्षाचालकांचा देखील समावेश आहे.

शहरात आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली असून पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्यासह सुमारे शंभर पोलीस जवान, महिला पोलीस, वाॅर्डन, पोलीस मित्र दिवसभर वाहतूक नियोजनासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने ही कारवाई करण्यात आली.

  • सहारा पुल ‘नो पार्किंग झोन’
    भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावरील सहारा पुलावर वाहने उभी करणे, फोटो काढणे, घोळक्याने उभे राहणे यास मनाई करण्यात आली आहे. सहारा पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही कोंडी व पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सांगितले.

हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा
पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करत सार्वजनिक शांततेचा भंग करणार्‍या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणे, आरडाओरडा करत रस्त्यावर नाचणे, मुलींना व महिलांना पाहून अश्लिल हावभाव करणे, धोकादायक ठिकाणी जात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या हुल्लडबाजांची कोणतीही गय न करता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा लोणावळा शहर व ग्रामीण पोलीसांकडून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.