Lonavala : भुशी धरणावर पोलीस कर्मचार्‍यांला जबर मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज- भुशी धरणाच्या पायर्‍यांवर एकमेकांच्या पॅन्ट ओढत दंगा करणार्‍या तरुणांना रागावल्याचा राग मनात धरत पोलीस कर्मचार्‍यांला संगनमत करुन जबर मारहाण करणार्‍या पाच जणांवर लोणावळा शहर पोलीसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. गुरुवारी (दि.८ ) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये पोलीस काॅन्स्टेबल सुभाष दत्तु शिंदे यांच्या डोक्याला मार लागला आहे.

शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुल लालासाहेब कदम (वय 30), राहुल दिलीप गुणवरे (वय 30), अतुल अंबादास गुणवरे (वय 30), पवन शिवाजी गुणवरे (वय 28), दत्तात्रय कुंडलिक गुणवरे (वय 28 सर्व राहणार स्वामी चिंचोली, गुणवरे वस्ती, दौंड पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड येथील पाच युवक भाड्याची गाडी करून लोणावळ्यात फिरायला आले होते. दुपारच्या सुमारास दारु पिऊन भुशी धरणावर आले. आल्यापासून त्यांची हुल्लडबाजी सुरु होती. त्यांना धरणावर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचारी शिंदे यांनी समज दिली. यानंतर देखील त्यांचा दंगा सुरु होता. ते पायर्‍यांवर एकमेकाच्या पॅन्ट खाली खेचत धुडगुस घालत होते. यावेळी त्यांना धरणाच्या पायर्‍यांवरुन हाकलण्यात आले.

सायंकाळी सहा वाजता धरणावरील सर्व पर्यटकांना बाहेर काढत शिंदे हे पोलीस ठाण्याकडे येण्यासाठी निघाले असता कदम व गुणवरे यांनी संगनमत करत शिंदे यांना वेढा घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिंदे याच्या कपाळाला डोळ्याच्यावर मार लागला आहे. पोलिसांना मारहाण करत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक व काही पर्यटकांनी शिंदे यांना त्याच्या तावडीतून सोडवत दोन जणांना पकडले तर तीनजण घटनास्थळावरुन पळून गेले. या सर्वांना पोलीस पथकाने शोध घेत रात्री पडकून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.