Lonavala : शहर पोलीस ठाण्यात पोलीस दादा, पोलीस ताई, बडी काॅप, भरोसा सेलचे अनावरण

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेकरिता पोलीस दादा, पोलीस ताई, बडी काॅप, भरोसा सेल हे उपक्रम सुरु करण्यात आले. तसेच महिलांकरिता सॅनेटरी वेडिंग मशिन बसविण्यात आले.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या संकल्पनेतून हे सर्व उपक्रम राबविण्यात आले. यावेळी बोलताना मनोज यादव म्हणाले मासिक पाळी हा महिलांचा खाजगी विषय असल्याने त्यावर कोणीही उघडपणे बोलत नसले तरी त्यामुळे होणारा त्रास व संसर्ग हा महिलांकरिता वेदनादायक आहे. याकरिता पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी, आरोपी महिला, चौकशी करिता येणार्‍या महिला या सर्वांकरिता ह्या सॅनेटरी वेडिंग मशिनचा उपयोग होणार आहे. उद्योजिका दीपाली आगरवाल यांनी ही मशिन दिली आहे.

लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे हाॅटेलमध्ये काम करणार्‍या महिला रात्री उशिरा घरी जातात तसेच शाळेतील मुली शाळेत येताना व घरी जाताना त्यांनी सुरक्षित वाटावे याकरिता लोणावळा शहर पोलीसांनी पोलीस दादा, पोलीस ताई, बडी काॅप, भरोसा सेल हे उपक्रम सुरु केले असून महिलांनी रस्त्यांने जाताना, कामाच्या ठिकाणी तसेच शाळा व इतर कोणत्याही ठिकाणी असुरक्षितता जाणवत असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पाच मिनिटात पथक घटनास्थळावर दाखल होतील असा प्रतिसाद दिला जाईल असे सांगितले.

राष्ट्रीय धावपटू संगिता यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटक शादान चौधरी, उद्योजिका दीपाली आगरवाल, नगरसेवका सेजल परमार, सिंधू परदेशी, अपर्णा बुटाला, कल्पना आखाडे, ज्योती मोरे, यमुना साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे व प्रियंका माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रियंका माने म्हणाले समाजाने महिलांकडे संधी म्हणून न पाहता जबाबदारी म्हणून पाहिल्यास महिलांवरील अत्याचार कमी होतील. महिलांनी स्वंयपुर्ण होण्यासोबत स्वंयबध्द व्हावे म्हणजे कोणी महिलांकडे वाकडी नजर करुन पाहणार नाही असे सांगितले.

यावेळी शादान चौधरी, यमुना साळवे व अपर्णा बुटाला यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. अमोल कसबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर वैभव स्वामी यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.